Nida Khan arrested in Nashik TCS case: टीसीएस कंपनीतील लैंगिक शोषण आणि धार्मिक भावना दुखावण्याच्या प्रकरणात नाशिकरोड सत्र न्यायालयाने फरार संशयित निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलेला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून ४० दिवसांहून अधिक कालावधी लोटला असला तरी नाशिक पोलिसांना तिचा ठावठिकाणा लागत नव्हता. तांत्रिक पथकासह तीन पथके मागावर असतांनाही निदा गुंगारा देत होती. ही शोध मोहीम अखेरीस संपुष्टात आली असून निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात घेण्यात आले आहे.
येथील टीसीएस कंपनीत महिलांचे लैंगिक शोषण आणि धार्मिक भावना दुखावणे, धर्मांतराचा प्रयत्न असे अनेक गंभीर प्रकार समोर आले. देवळाली कॅम्पसह मुंबई नाका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हे दाखल असून आतापर्यंत या प्रकरणात सातहून अधिक संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. परंतु, या प्रकरणातील संशयित निदा खान मार्चच्या अखेरीस पहिला गुन्हा दाखल झाला, तेव्हापासून फरार झाली होती. निदा ४० दिवसांपासुन पोलिसांना गुंगारा देत होती. या काळात निदा खानने वकिलांमार्फत अटकपूर्व जामिनासाठी नाशिकरोड सत्र न्यायालयात धाव घेतली. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर मागील आठवड्यात न्यायालयाने निदाचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला होता. पीडितेच्या धर्मांतराचे नियोजन करणे, रोजा धरणे, हिजाबचा वापर याविषयी तिला प्रशिक्षण, मालेगावसह परदेशातील काही धागेदोरे आदींचा तपशील मिळविण्यासाठी निदा सापडणे पोलिसांसाठी गरजेचे झाले आहे. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील गुन्ह्यासह मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातही तिचा शाेध घेतला जात होता.
विलंब का झाला ?
यापूर्वी पोलीस पथकांनी निदा खानचा मुंब्रासह तिच्या नातेवाईकांच्या घरी इतरत्र शोध घेतला होता. परंतु, ती सापडली नाही. निदा न सापडण्याचे कारण म्हणजे तिचा विशिष्ट पेहराव असल्याचे मानले जात आहे. अल्पसंख्याकांची वस्ती असलेल्या भागात निदाचे निवासस्थान आहे. या ठिकाणचे लोक तपासात सहकार्य करीत नाहीत. यामुळे तपास करतांना अडचणी येत असून तिचा पेहरावही यासाठी अडचणीचा ठरल्याचे सांगितले जात होते. तपासी पथकाबरोबर महिला अधिकारी, कर्मचारी असले तरी अल्पसंख्याक घटकातील प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावरील विशिष्ट पेहराव बाजूला करणे शक्य नाही. यामुळे काही मंडळीकडून धार्मिक मुद्दे पुढे केले जात आहेत. याचा परिणाम तपासावर होत असून जंगजंग पछाडूनही निदा पोलिसांच्या हाती न सापडण्याचे ते कारण ठरले होते. महाराष्ट्रासह राज्याबाहेर तिचा शाेध घेतला जात होता. ही शोध मोहीम अखेर संपुष्टात आली.
अखेर शोध मोहीम यशस्वी
टीसीएस कंपनीतील गुन्ह्यात निदा खानला पकडण्यात अखेर पोलिसांना यश आले. नाशिकचे पोलीस आयुक्त संदिप कर्णिक आणि विशेष तपास पथकाचे प्रमुख तथा सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी या संदर्भात माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर येथून निदा खानला ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या मदतीने फरार निदा खानला पकडण्यात आले.
