नाशिक – टीसीएस कंपनीतील लैंगिक शोषण आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणात नाशिकरोड सत्र न्यायालयाने फरार संशयित निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
संशयित निदा खानच्या अर्जावर गतवेळी नाशिकरोड सत्र न्यायालयात दोन्ही बाजुंचा युक्तिवाद पूर्ण झाला होता. शनिवारी न्यायालयाने यावर निर्णय दिला. संशयित निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर झाल्याची माहिती विशेष सरकारी अभियोक्ता अजय मिसर यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
संशयितेचा गुन्ह्यातील सहभाग, तिच्याविरुद्ध प्रथमदर्शनी असणारे पुरावे, कोठडीतील चौकशीसाठी सरकारी पक्षाने मांडलेली कारणे आणि तिच्या अटकेशिवाय हा तपास पुढे कसा जाणार नाही, हा केलेला युक्तिवाद विचारात घेऊन सत्र न्यायालयाने संशयित निदा खानचा देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अटकपूर्व जामीन नामंजूर केल्याचे मिसर यांनी सांगितले.
निदा खानचे वकील राहुल कासलीवाल यांनी जे नातेवाईक निदा खानच्या संपर्कात होते, त्यांच्या निर्णयाने उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तवली. अटकपूर्व जामीन नामंजूर होण्यामागे गुन्ह्याची गंभीरता हे कारण असू शकेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
संशयितांनी पीडितेच्या धर्मांतराचे नियोजन केले, रोजा पकडणे, हिजाबचा वापर, याबद्दल तिला प्रशिक्षण देण्यात आले. पीडितेचे नाव बदलून हनिया ठेवले होते. धर्मांतराच्या कागदपत्रांशी संबंधित काही बाबी मालेगावशी संलग्न आहेत. संशयित विवाहित असल्याचे लक्षात आल्यावर पीडितेला मलेशियाला पाठवण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती सरकारी पक्षाने यापूर्वी मांडली होती. गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यात निदा खानला अटक केली तर सर्व बाबी उघड होतील, याकडे लक्ष वेधून सरकारी पक्षाने अटकपूर्व जामिनाला विरोध केला होता.
निदा खान अजूनही पसार…
टीसीएस प्रकरणी नऊ वेगवेगळ्या गुन्ह्यात सात संशयितांना पोलिसांनी अटक केलेली आहे. लैंगिक शोषण, धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गेल्या २६ मार्च रोजी पहिला गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून निदा खान फरार आहे. या गुन्ह्यात संशयित दानिश शेख आणि तौसिफ अख्तर हे न्यायालयीन कोठडीत आहेत. पोलिसांनी मुंब्रासह नातेवाईकांच्या घरी निदा खानचा शोध घेतला. परंतु, ती सापडली नाही.
पहिला गुन्हा दाखल होऊन शनिवारी जवळपास ३८ दिवस झाले. इतके दिवस तिने पोलिसांना गुंगारा दिला. याच काळात वकिलामार्फत अटकपूर्व जामिनासाठी वैद्यकीय कारण देत न्यायालयात धाव घेतली. निदा तीन महिन्यांची गर्भवती असून इतरही मुद्दे तिच्या वकिलांनी मांडले होते. या संदर्भात मुंब्रातील डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले होते.
