नाशिक – ‘हिंदू हित रक्षा नाशिक’च्या वतीने नुकत्याच येथे आयोजित ‘हिंदूंचा रुपया हिंदूलाच’ या कार्यक्रमात हिंदू कारागीर आणि लघु व्यावसायिकांच्या सूचीचे आणि संकेतस्थळाचे प्रकाशन राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी हिंदूंच्या मंदिरांशेजारी हिंदूच विक्रेते असायला हवेत, जिहादी वृत्ती असलेल्यांशी व्यवहार टाळावेत, असे आवाहन केले होते.

त्यांच्या या कार्यक्रमातील विधानावर आक्षेप घेतला जात असून संविधानाची शपथ घेऊन धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या मंत्री नितेश राणे यांच्यावर राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस आयुक्त कधी कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.​मंत्री नितेश राणे हे गेल्या शनिवारी नाशिक दौऱ्यावर होते.

हिंदू हित रक्षाच्या वतीने येथील एका लॉन्समध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांनी हिंदूंचा पैसा हा हिंदूंसाठीच आहे, असे म्हटले. हिंदू व्यावसायिक दुकानातून व्यवहार करीत यातून मिळणारे उत्पन्न हिंदू धर्माच्या संवर्धनासाठी वापरून हिंदूंची ताकद वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले होते. पुढील वर्षी नाशिकमध्ये कुंभमेळा होत आहे. कुंभमेळा हा हिंदू धर्माचा उत्सव आहे.

त्यामुळे त्या ठिकाणी हिंदूंचीच दुकाने असावीत, अशी आमची भूमिका आहे. हिंदूंच्या हिताविषयी हिंदू राष्ट्रात बोलायचे नाही तर कुठे बोलायचे, असा प्रश्नही त्यांनी केला होता. हिंदूंच्या श्रद्धेचा अनादर करणाऱ्या आणि जिहादी मानसिकता ठेवणाऱ्या व्यावसायिकांबरोबर आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमात ५७ व्यावसायिक प्रकारांतील १३६४ व्यावसायिकांची सूची जाहीर करण्यात आली.

हा उपक्रम महाराष्ट्र व भारतभर सुरू करावा, असे आवाहन मंत्री राणे यांनी केले.​या कार्यक्रमात मंत्री राणे यांनी केलेल्या विधानाचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटले. त्यावर राजकीय व संविधानप्रेमी नाशिककर वर्तुळातून प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. संविधान प्रेमी नाशिककरचे पदाधिकारी राजू देसले यांनी मंत्री नितेश राणे यांचे विधान हा संविधानाचा अवमान असल्याचे नमूद केले.

नाशिक शहरात कुंभमेळा ‘हरित कुंभ’ व्हावा यासाठी प्रशासन व शासन राबत असताना, राज्य सरकारचे मंत्री नाशिक शहरात येऊन धार्मिक जिहादची भाषा करीत असल्याकडे देसले यांनी लक्ष वेधले. याची दखल राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांनी घेतली पाहिजे. संविधानिक पदावर असताना लोकप्रतिनिधी व मंत्र्यांनी धार्मिक तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य करणे असंवैधानिक आहे.

मंत्री राणे यांच्या विधानाचा निषेध करीत शासनाने याची दखल घ्यावी. संविधानाची शपथ घेऊन धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या मंत्र्यांविरुद्ध गृहमंत्री कधी कारवाई करणार, असा प्रश्न देसले यांनी उपस्थित केला आहे.