जळगाव : आज जळगाव जिल्ह्यात भाजपची जी ताकद दिसते, त्यामागे अनेक कार्यकर्त्यांचे कष्ट आहेत; मात्र त्या पिढीतील नेत्यांमध्ये एकनाथ खडसेंचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते, अशा शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या राजकीय योगदानाचा गौरव केला आहे. खडसे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त गडकरी यांनी त्यांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीतील योगदान आणि भाजपच्या पक्ष संघटन उभारणीतील भूमिकेवर प्रकाश टाकला आहे.

जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्र-खान्देशात भाजपचा विस्तार होत असताना एकनाथ खडसे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे गडकरी यांनी नमूद केले आहे. पक्षाचा विचार समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचविणे, कार्यकर्त्यांना संकटाच्या काळात धीर देणे, विरोधकांच्या टीकेला सामोरे जाणे आणि अपयशानंतर पुन्हा उभे राहण्याची त्यांची कार्यपद्धती पक्षासाठी महत्त्वाची ठरली. त्यांनी उभारलेली कार्यकर्त्यांची फळी, जनसंपर्क आणि लोकांमध्ये निर्माण केलेला विश्वास याचा पक्षाला पुढील काळात मोठा फायदा झाल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांवर संघर्ष

गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विरोधी पक्षात असताना एकनाथ खडसे यांनी शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नांवर सरकार विरोधात सातत्याने संघर्ष केला. विधानसभेत संबंधित घटकांचे प्रश्न मांडताना केवळ भाषणबाजी न करता त्यामागे अभ्यास, तयारी आणि जनतेच्या प्रश्नांबद्दलची तळमळ आवश्यक असते, असे सांगत गडकरी यांनी खडसेंच्या विधिमंडळातील कामाचेही कौतुक केले आहे. पाणी, सिंचन, रोजगार, शेती आणि ग्रामीण विकासाच्या विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठविल्याचे गडकरी यांनी नमूद केले आहे.

जोशींच्या मंत्रिमंडळातही सोबत काम

एकनाथ खडसे यांच्याशी माझे व्यक्तिगत संबंध आहेत, असे सांगताना नितीन गडकरी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात सोबत काम केल्याच्या आठवणींनाही उजाळा दिला आहे. त्या काळात गडकरी यांच्याकडे बांधकाम खाते, तर खडसे यांच्याकडे जलसंवर्धन विभागाची जबाबदारी होती. महाराष्ट्रासारख्या राज्यात पाणी हा केवळ विकासाचा नव्हे, तर अस्तित्वाचा प्रश्न असल्याने जलसंवर्धनाच्या कामाकडे खडसे यांनी ग्रामीण भागाच्या गरजा लक्षात घेऊन पाहिल्याचे गडकरी यांनी सांगितले.

इतिहास लिहिला जाईल तेव्हा…

एकनाथ खडसे यांचे योगदान केवळ त्यांनी भूषविलेल्या पदांपुरते मर्यादित नसून भाजपची संघटना उभी करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान हीच त्यांची खरी ओळख असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. आजच्या भाजपच्या यशाच्या दिवसांमध्ये त्यांच्या योगदानाला विसरता येणार नाही. भविष्यात इतिहास लिहिला जाईल, तेव्हा खडसे यांच्या योगदानाचा उल्लेख आदराने आणि कृतज्ञतेने केला जाईल, असेही गडकरी यांनी म्हटले आहे.