नाशिक – त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संत निवृत्तीनाथ दिंडी पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या ६० वर्षाच्या महिलेचे सोमवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी त्र्यंबकेश्वर येथुन २९ जून रोजी पंढरपुरच्या दिशेने मार्गस्थ झाली. या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या करता पालखी सोबत पोलीस बंदोबस्त, आरोग्य विभाग तसेच विविध सामाजिक संस्थांचे पथके कार्यरत आहे.
नाशिकच्या वेशी नंतर पालखी अहिल्या नगर मार्गे पंढरपुरकडे मार्गस्थ होणार आहे. वारीचा अहिल्या नगर परिसरात बाजार समितीच्या आवारात रविवारी मुक्कामी होती. यावेळी पालखीत सहभागी झालेल्या सुमनबाई मधुकर कांडेकर (६०, रा. जातेगाव, नाशिक) या अन्य नातेवाईकांबरोबर कानिफनाथ गढीवर दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. दर्शनानंतर रात्री त्या पुन्हा पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या. सोमवारी पहाटे आरतीसाठी सुमनबाई उठल्या नाहीत. त्या बेशुध्द असल्याचे त्यांच्या नातेवाईकांच्या लक्षात आले.
त्यांनी संत निवृत्तीनाथ देवस्थानचे अध्यक्ष राहुल महाराज साळुंखे यांना माहिती दिल्यावर त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे सांगितले. आ. संग्राम जगताप यांनी कांडेकर यांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी पोहचविण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.
या घटनेमुळे वारीतील अनेकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यंदा वारीत ७० हजाराहून अधिक वारकरी सहभागी झाले आहेत. वारकऱ्यांना जुलाब, उलटी असे किरकोळ त्रास होत आहेत. आरोग्य विभागाचे पथक पूर्णवेळ बरोबर असल्याने कुठल्याच तक्रारी नसल्याचे राहुल महाराज साळुंखे यांनी नमूद केले.
