नाशिक – पंचवटीतील प्रभाग क्रमांक एकमध्ये उभारण्यात येत असलेल्या स्टेडिअमचे अंतिम टप्प्यातील काम महापालिकेने थांबवले आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात या जागेचा वाहनतळासाठी उपयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुंभमेळ्यासाठी लागणाऱ्या मोठ्या निधीसाठी महापालिकेने कोट्यवधींच्या खर्चाला कात्री लावत काटकसरीचा मार्ग स्वीकारला आहे.
पंचवटीतील सर्वे क्रमांक ३२५, ३२६, ३२७ येथील जागेत महापालिका आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअम उभारण्यात येत आहे. त्यासाठी सुमारे ३० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सप्टेंबर २०२५ पर्यंत ते पूर्ण करण्याची मुदत आहे. सद्यस्थितीत ९० टक्के काम पूर्ण झाले असून ठेकेदाराला २१ कोटी ५८ लाख रुपयांचे देयक दिल्याचे मनपाने म्हटले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यास दोन वर्षांचा अवधी असून पुढील वर्षभर तो सुरू राहील. याचा विचार करता तीन वर्षे क्रीडापटूंना मैदानापासून वंचित रहावे लागणार आहे.
२०२७-२८ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. प्रयागराजचा अनुभव लक्षात घेता नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविक सहभागी होण्याचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने चाललेल्या नियोजनात भाविकांच्या वाहनतळासाठी या जागेचा उपयोग करता येईल, या दृष्टीकोनातून मध्यंतरी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती. यानंतर स्टेडिअमच्या जागेचा सिंहस्थात वाहनतळासाठी उपयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तसा ठराव मंजूर करण्यात आला.
सिंहस्थासाठी काटकसर
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेने सुमारे १५ हजार कोटींचा आराखडा तयार केला आहे. आर्थिक व्यवस्था करण्यासाठी मनपाच्या बँकेतील ठेवी मोडण्याचे निश्चित केले आहे. स्टेडिअमच्या कामाला स्थगिती देताना कुंभमेळा आणि मनपाच्या आर्थिक परिस्थितीनुसार या ठिकाणी कोणत्याही स्वरुपाचे खोदकाम, काँक्रिट काम करू नये, असे सूचित करण्यात आले. या ठिकाणी पूर्वी खोदलेल्या ठिकाणी सपाटीकरण करून काम थांबवावे, अशी सूचना मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी केली आहे. स्टेडिअमच्या कामावरील पुढील खर्चाला ब्रेक लावला गेला आहे.
प्रशासकीय राजवटीत महापालिकेत अंधाधुंद कारभार सुरू आहे. स्टेडिअमचे इतके काम झालेले असेल तर, ते पूर्ण करून खेळाडूंसाठी उपलब्ध व्हायला हवे, सिंहस्थ कुंभमेळ्यात पर्वणीच्या काळात ही जागा वाहनतळासाठी लागणार आहे. काम थांबल्याने पुढील अडीच ते तीन वर्ष खेळाडू वा खेळासाठी ते उपलब्ध होऊ शकणार नाही. प्रभाग एकमध्ये अनेक भागात ४५ मिनिटे पाणी पुरवठा होतो. पाणी पुरवठ्याशी संबंधित कामे मंजूर होऊनही ती सुरू झालेली नाहीत. – अरूण पवार (माजी नगरसेवक)