नाशिक महानगरपालिका निवडणुकीत भाजपने ६६ जागा जिंकून मिळविलेले यश हे अभूतपूर्व असेच आहे. मतमोजणीच्या काही काळ आधी धाकधूक होती. मात्र शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांना बहुमताचा दांडगा आत्मविश्वास होता. आणि त्यांचा शब्द खरा ठरला. या विजयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे श्रेयही मोलाचे असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन व्यक्त केले. नाशिक महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत निवडून आलेल्या भाजपच्या विजयी उमेदवारांचा सत्कार सोहळा आज वसंतस्मृती कार्यालयात पार पडला. यावेळी ते बोलत होते. पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल, विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, सुनील बागूल, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष आ.बाळासाहेब सानप, आ.देवयानी फरांदे, आ.सीमा हिरे, आ.अपूर्व हिरे, विजय साने यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

काही उणिवा आणि चुकांमुळे पक्षाच्या जागा घटल्या अन्यथा पक्षाने ८०+ चे लक्ष्य निश्चितच गाठले असते. मुख्यमंत्र्यांच्या सभेमुळे पक्षाला १५ ते २० जागा जास्त मिळाल्या. गेल्या निवडणुकीत नाशिककरांनी मनसेच्या झोळीत भरभरून मतांचे दान देऊन त्यांचे ४० नगरसेवक निवडून आणले. मात्र निवडणुकीनंतर राज ठाकरेंनी नाशिककरांचा भ्रमनिरास केला आणि आज ते त्याची फळे भोगत असून या पक्षाची सदस्य संख्या ५ वर आल्याचेही ते ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतले आहे. मी आता नाशकात अधिक जोमाने लक्ष देत येत्या पाच वर्षांत नाशिकचा कायापालट करणार असेही ते म्हणाले. महापालिकेवर निवडून आलेल्या सदस्यांनी पक्षाची शिस्त पाळावी, विविध बैठकांना उपस्थित राहावे, जनतेशी सतत संपर्क ठेवावा, त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे असा सल्लाही ना.महाजन त्यांनी उपस्थितांना दिला. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये भाजपाला मिळालेल्या यशाचेही त्यांनी कौतुक केले.  भाजपाला नाशिक महापालिका निवडणुकीत मिळालेल्या यशाची नोंद सुवर्णाक्षरांनी होईल,असे पर्यटनविकास मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषदेत भाजपने १५ जागा जिंकल्या तर पंचायत समित्यांमध्येही पक्षाची कामगिरी अतुलनीय झाली आहे. आता नाशिक स्मार्ट करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांना सर्वांनी साथ द्यावी असेही ते म्हणाले. शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संघटन कौशल्य, पक्षात सर्वांचे सहकार्य आणि पालकमंत्र्यांचे मार्गदर्शन यामुळेच हे यश मिळाल्याचे ते म्हणाले. निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत विजयी झालेल्या उमेदवारांचा मंत्र्यांच्या हस्ते पुष्प गुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. नाना शिलेदार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सतीश कुलकर्णी, संभाजी मोरूस्कर, प्रशांत जाधव, नाना शिलेदार, गोपाळ पाटील यावेळी उपस्थित होते.