मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील प्रचारसभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली आहे. ठाकरे बंधूंची लेना बँक आहे. देना बँक नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली. राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये पाच वर्षे केवळ नक्कलच केली. विकासकामे केली नाहीत. कृष्णकुंज बँकेची शाखा कुठेही नाही, असेही ते म्हणाले.

नाशिकमधील प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीलाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर तोफ डागली. चुकीची गुंतवणूक केली तर व्याज मिळत नाही. कधी-कधी परतावा मिळत नाही. त्यामुळे मतांची गुंतवणूक करायची आहे. ती चांगल्या बँकेत झाली पाहिजे. त्यासाठी पहिला पर्याय आहे. भाजप बँक आहे. त्या बँकेचे प्रमुख नरेंद्र मोदी आहेत. ही विकासाची बँक आहे. तुमच्या मताची गुंतवणूक या बँकेत केली तर, पाच वर्षांत पाच पट विकासाचे व्याज देऊन तुमची गुंतवणूक परत करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी मतदारांना दिले.

उद्धव ठाकरे – आदित्य ठाकरेंची ही बँक लेना बँक आहे. देना बँक नाही. त्यांना घ्यायचे कळते. द्यायचे कळत नाही. दुसरी बँक राष्ट्रवादीची ती बंद आहे. तिसरी बँक राज ठाकरेंची आहे. हेड ऑफिस कृष्णकुंजवर आहे. त्यांची कुठेही शाखा नाही, अशी तोफ राज ठाकरेंवर डागली. मतांची गुंतवणूक भारतीय जनता पक्षात करायची आहे. भाजप विकास करणारी बँक आहे. त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवा, असे आवाहनही फडणवीस यांनी नाशिककरांना केले.

राज ठाकरे यांनी काल नाशिकमधील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नक्कल केली होती. त्यावरून त्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. राज ठाकरे यांना निवडणुकीनंतर केवळ एकच काम उरणार आहे. नकला करण्याच्या पलिकडे कोणतेही काम उरणार नाही. आता निवडणुकीनंतर तुम्हाला कोणतेही काम उरणार नाही. महाराष्ट्रातील सर्व शाखा बंद झाल्या आहेत. फडणवीस यांची नक्कल केली तर लोक मते देतील, असे त्यांना वाटते. लोकांना हे मूर्ख समजत आहेत का? असा सवाल त्यांनी केला. नकलांना भूलून लोकांनी एकदा मते दिली. पण आता नकलेच्या आधारावर पुन्हा मते मिळवता येणार नाहीत. नाशिकमधील कुंभमेळ्याची कामे केली असे ते सांगतात. कुंभमेळ्यातील कामे सरकारने केली. गिरीश महाजन यांची कुंभमेळा मंत्री म्हणून नेमणूक केली. त्या माध्यमातून कामे केली, असेही त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे म्हणतात की कर्जमाफी करायची. ही आमची पण इच्छा आहे. पण त्या शेतकऱ्यांना फक्त कर्जमुक्त नाही, तर आर्थिकदृष्ट्या सक्षम करून मग कर्जमुक्त करायचे आहे, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले. राज ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीकास्त्र सोडले. राज ठाकरे यांना फक्त नक्कलच करता येते. गेली पाच वर्षे त्यांनी फक्त नक्कलच केली. विकासकामे केली नाहीत, असेही ते म्हणाले. राज ठाकरे यांच्याकडून बोटॅनिकल गार्डनचा जप सुरू आहे. आम्ही दिलेल्या पैशांतून नाशिकमधील कामे झाली, असेही त्यांनी सांगितले. मतांची गुंतवणूक भाजपमध्ये करा, असे आवाहनही त्यांनी केले. आजपासून मी नाशिक दत्तक घेतो, अशी घोषणा करतो. येत्या पाच वर्षांत मी नाशिक दत्तक घेऊन नाशिकचा विकास करीन. तुम्ही मला एकहाती सत्ता द्या. भाजपला निवडून द्या. नाशिक शहराचे वैभव पुन्हा मिळवून देण्याचे आश्वासन मी देतो, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

महाराष्ट्र बदलत आहे. नाशिक बदलले पाहिजे. नाशिकला कोणी वाली नाही, असे म्हटले जाते. नागपूरवर गडकरी लक्ष देतील. आजपासून नाशिक दत्तक घेत आहे, अशी घोषणा मी करतो. नाशिकचे भवितव्य बदलून टाकीन. एकहाती सत्ता द्या, मी शहराचा विकास घडवून आणेन. येत्या पाच वर्षांत नाशिकची कामे झाली नाहीत तर नाशिककरांना कधी तोंड दाखवणार नाही, असेही त्यांनी मतदारांना सांगितले.