नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी सिंहस्थ कुंभमेळा कामांची पाहणी करून माहिती घेतली. स्थानिक पुरोहित व नागरिकांशी संवाद साधला. कुंभमेळ्याच्या कामांची माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. एकाने थाटलेली हॉटेल्स, दुसऱ्याने नोएडात उभारलेला महाल व त्यातील दोन कोटींचे एकेक झुंबर, तर अन्य एकाने नाशिकमध्ये २५ कोटींचे गेस्ट हाऊस उभारल्याकडे लक्ष वेधत आमदार पवार यांनी कुंभमेळ्याच्या कामांत प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी पारदर्शकता राखली नसल्याचा आरोप केला. आमदार पवार यांनी स्पष्टपणे नामोल्लेख टाळल्याने नोएडात महाल बांधणारा अधिकारी कोण, याची चर्चा राजकीय व प्रशासकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
कुंभमेळ्याच्या कामांसंबंधीची माहिती आपण नाशिकच्या कुंभमेळा प्राधिकरणासह अनेक विभागांकडे मागितली होती. काही कार्यालयांकडून त्रोटक माहिती प्राप्त झाली असून, अनेक अधिकारी ती दडपत असल्याचा आरोप आमदार पवार यांनी केला. कुंभमेळ्याच्या निमित्ताने ३५ हजार कोटींच्या पायाभूत सुविधा उभारण्यास आपला आक्षेप नाही. हा निधी गोदावरी स्वच्छता, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, वीजवाहिन्या भूमिगत करणे यावर खर्च झाला पाहिजे. परंतु तसे घडलेले नाही. नियोजनाअभावी गोदावरीत पाणी नाही. गोदापात्रात मिसळणारे सांडपाणी व औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्यातील रसायनांमुळे दूषित पाण्याचा भाविकांवर होऊ शकणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.
माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर आमदार पवार यांनी आक्षेप घेत त्यांना सूचक इशारा दिला. कधीकाळी जळगावमध्ये काम करणारे अधिकारी नाशिकमध्ये आणले गेले. नाशिकसह महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांशी दुजाभाव करण्यात आला. ज्या अधिकाऱ्याने एक लाख वृक्ष तोडले, कागदोपत्री ३६०० झाडे दाखवली. सीएसआरअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.
संबंधिताने नाशिक परिसरात अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स उभारली. संबंधिताकडे अकस्मात इतका पैसा कसा आला, असा प्रश्न आमदार पवार यांनी केला. एक अधिकारी नोएडात इतका मोठा महाल बांधत आहे की, त्यातील एकेक झुंबर दोन कोटींचे आहे, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. नाव बदलेल बोलणाऱ्या एका अधिकाऱ्याने नाशिकमध्ये २५ कोटींचे गेस्ट हाऊस उभारले, तो तिथे वास्तव्यास गेला, असा आरोप करीत आता त्यांना किती वेळा नाव बदलावे लागेल, असेही त्यांनी सूचित केले.
