नाशिक : उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसासाठी ओळखला जाणारा परिसर दुष्काळाच्या छायेत, तर नेहमीच दुष्काळी अशी ओळख असणारा काही भाग दुष्काळाच्या बाहेर, असे चित्र शासनाच्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीतून समोर आले आहे. उत्तर महाराष्ट्रातील ३५ पैकी ३० तालुके दुष्काळी जाहीर झाले आहेत. यामध्ये धुळे, जळगाव व नंदुरबार या तीन जिल्ह्यांतील सर्वच तालुक्यांचा समावेश आहे. तर नाशिक जिल्ह्यात पाच तालुके वगळता उर्वरित १० तालुके यादीत आहेत.
सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील इगतपुरी, सुरगाणा आणि पेठ या घाटमाथ्यावरील भागात दरवर्षी मुसळधार पाऊस कोसळतो. इगतपुरीतील धरणे राज्यातील अनेक भागांची तहान भागवतात. यंदाच्या हंगामात पावसाने ओढ दिल्यामुळे हे तिन्ही तालुके संकटात सापडले आहेत. दुसरीकडे, अवर्षणप्रवण अशी गणना होणारा चांदवड तालुका प्रथम कळ लागू झालेल्या यादीत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. या तालुक्यातील पाच मंडळांत पावसाचा मोठा खंड पडला. तीन मंडळांत तशी स्थिती नसल्याने तालुका यादीत समाविष्ट झाला नसल्याचे कृषी अधिकारी सांगतात. साक्री व पारोळा या तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस होऊनही ते दुष्काळी यादीत आहेत. यामागे पावसात पडलेला खंड हे कारण असल्याचे सांगितले जाते. सातपुडा पर्वतराजीत वसलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील मुसळधार पावसासाठी ओळखल्या जाणाऱ्या धडगाव, अक्कलकुवा व नवापूर या तालुक्यांनाही दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे.
या हंगामात उत्तर महाराष्ट्रात नंदुरबारमध्ये सरासरीच्या तुलनेत सर्वात कमी, म्हणजे ४२०.३ मिलिमीटर (४९ टक्के), पावसाची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात हे प्रमाण ६३९.९ मिलिमीटर (६९ टक्के), धुळे जिल्ह्यात ४३८.४ मिलिमीटर (८२ टक्के), तर जळगाव जिल्ह्यात ४८४.३ मिलिमीटर (७७ टक्के) इतके आहे. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात आजपर्यंत अपेक्षित सरासरीच्या केवळ ६४ टक्के पाऊस झाला आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार, ३३४ मंडळांपैकी २१२ मंडळांत पावसाचा २१ ते ४२ दिवसांहून अधिक कालावधीचा खंड पडला आहे.
पिकांची वाढ खुंटल्याने उत्पादनात घट
पावसाअभावी जून महिना कोरडा जाणे, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि तीन ते चार आठवड्यांचा दीर्घकालीन खंड यामुळे उत्तर महाराष्ट्रात सर्वदूर कोरडवाहू खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. दीर्घ पावसाच्या खंडामुळे हलक्या व मध्यम जमिनीतील उपलब्ध ओलावा कमी होऊन पिकांची वाढ खुंटली आहे. पुढील काळात समाधानकारक पाऊस न झाल्यास उत्पादनात मोठी घट येऊ शकते. सोयाबीनमध्ये दाणे भरण्याची प्रक्रिया अपूर्ण राहणे, कपाशीत फुलगळ होणे व बोंडधारणा कमी होणे यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. जळगावमध्ये विशेषतः उडीद, मूग, सोयाबीन, तीळ, मका आणि ज्वारी यांसारख्या अल्पावधीत येणाऱ्या पिकांच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. कोरडवाहू कपाशीची वाढही खुंटली असून कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ज्वारी, बाजरी व मका या पिकांचा उत्पादनक्षम कालावधी निघून गेल्यामुळे परतीचा पाऊस झाला तरी तो उत्पादन वाढीस उपयुक्त ठरणार नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
रब्बी हंगामावर परिणामाची चिन्हे
सलग दोन महिने कमी पाऊस पडल्यामुळे आणि पुढील काही दिवसांत समाधानकारक परतीचा पाऊस न झाल्यास भूजल पातळीवर विपरीत परिणाम होईल. त्यामुळे रब्बी ज्वारी, हरभरा, गहू व इतर पिकांचे पेरणी क्षेत्र तसेच विहिरी, कूपनलिका व इतर भूजलस्रोतांवर परिणाम होऊ शकतो. खरीप उत्पादनाबरोबरच रब्बी हंगामावरही प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तवली जात आहे.
