जळगाव : अल निनोच्या प्रभावामुळे पावसाची मोठी तूट निर्माण झाल्याने उत्तर महाराष्ट्रातील जळगावसह धुळे, नंदुरबार जिल्ह्यात खरीप पिकांच्या उत्पादनावर आधीच विपरीत परिणाम झाला आहे. परतीच्या पावसाअभावी जमिनीत पुरेसा ओलासा नसताना भूजल पातळी घटल्याने आणि सिंचन प्रकल्पांमधून आवर्तने मिळण्याची शक्यता कमी झाल्याने रब्बी पिकांच्या पेरण्यांनाही आता फटका बसण्याची चिन्हे आहेत. कृषी विभागानेही रब्बीचे क्षेत्र जवळपास ३५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
जळगाव जिल्ह्यात यंदा २३ टक्के, धुळे जिल्ह्यात १८ टक्के आणि नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक ५० टक्क्यांवर पावसाची तूट निर्माण झाल्याने खरीपातील उडीद, मूग, सोयाबीन, मका, कपाशीसारख्या पिकांचे उत्पादन लक्षणीय घटले आहे. दरम्यान, परतीच्या पावसानंतर खरीपातील नुकसान रब्बीत भरुन निघेल, अशी आशा शेतकरी बाळगून होते. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी शेतीची पेरणीपूर्व मशागतही केली. मात्र, परतीच्या पावसाकडूनही निराशा झाल्यानंतर जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने कोरडवाहू रब्बी ज्वारीचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचा आता नाईलाज झाला आहे. भूजल पातळी घटल्याने विहिरी आणि आवर्तन मिळण्याची शक्यता कमी झाल्याने सिंचन प्रकल्पांच्या पाण्यावर गहू, मका तसेच हरभऱ्याचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचीही वेगळी परिस्थिती राहिलेली नाही. या कारणाने उत्तर महाराष्ट्रातील जळगावसह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील रब्बीच्या क्षेत्रात पर्यायाने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर परिणाम
कृषी विभागाच्या माहितीनुसार, जळगावसह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील रब्बी पिकांचे सरासरी क्षेत्र सुमारे ४,५३,०९१ इतके आहे. ज्यामध्ये हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र १,४३,२५१ हेक्टर, त्यानंतर गव्हाचे सरासरी क्षेत्र १,३०,८८६ हेक्टर, मक्याचे सरासरी क्षेत्र १,०५,७९० हेक्टर आणि रब्बी ज्वारीच्या सरासरी ६२,६६४ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात समाधानकारक परतीच्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यात सरासरी क्षेत्राच्या १३४ टक्के, धुळे जिल्ह्यात १५३ टक्के आणि नंदुरबार जिल्ह्यात ११५ टक्क्यांपर्यंत विविध पिकांची पेरणी शक्य झाली होती. त्यातुलनेत यंदा रब्बीच्या पेरणी क्षेत्रात मोठी घट होण्याची चिन्हे असल्याने संबंधित सर्व शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर मोठा परिणाम होण्याची भिती व्यक्त होत आहे.
परतीचा पाऊस न झाल्याने तसेच ओलिताची मर्यादित सोय असल्याकारणाने जळगाव जिल्ह्यात यंदा रब्बी ज्वारीसह गहू, हरभरा आणि मका पिकाचे पेरणी क्षेत्र सुमारे ३० ते ३५ टक्क्यांनी घटण्याची चिन्हे आहेत. अल्प ओलाव्यावर उगवलेल्या पिकांना पुढे पाणी उपलब्ध न झाल्यास फटका बसू शकेल. – कुरबान तडवी (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव)
