एप्रिलच्या उत्तरार्धात उत्तर महाराष्ट्रातील तापमानाचा पारा झपाटय़ाने वर चढला असून उन्हाची तीव्रता शिगेला पोहोचली आहे. राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद होणाऱ्या जळगाव जिल्ह्यात यंदाही तापमानाने ४२ अंशांची पातळी गाठली. नाशिक, मालेगाव, धुळे, जळगाव व नंदुरबार या भागातील तापमानही कमी-अधिक प्रमाणात त्याच दिशेने मार्गक्रमण करत आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने आरोग्याची खबरदारी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. नाशिकमध्ये आदल्या दिवशीच्या तुलनेत पारा किंचितसा कमी झाला असला तरी उन्हाची धग कायम आहे.
उत्तर महाराष्ट्रात आता खऱ्या अर्थाने टळटळीत उन्हाळ्याची दाहकता जाणवत आहे. मार्चपासून वाढणारे तापमान एप्रिलच्या मध्यावर ही उंची गाठते, असा अनुभव आहे. थंड हवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या नाशिकने नुकताच ४० अंशाचा टप्पा ओलांडला. जळगावने तर तो पल्ला आधीच ओलांडला होता. जळगावसह मालेगाव, धुळे व नंदुरबार भागात उष्णतेची लाट आल्याची स्थिती आहे. सकाळी दहा वाजल्यानंतर उन्हाचे अक्षरश: चटके बसतात. दुपारी त्याची तीव्रता अधिकच वाढते. त्याचा जनजीवनावर परिणाम झाला असून दुपारी सार्वजनिक ठिकाणी वर्दळ कमी होते. या काळात बाहेर भ्रमंती करणे म्हणजे आजाराला निमंत्रण देण्यासारखे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. वाढत्या तापमानाने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. दरवर्षी भेडसावणाऱ्या या संकटाला तोंड देण्यासाठी जळगाव जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
नाशिकचा विचार करता एप्रिलच्या मध्यावर ४० अंशांचा टप्पा ओलांडत हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. १४ एप्रिलला हंगामातील सर्वाधिक ४०.३ अंशाची नोंद झाली होती. शुक्रवारी तापमान काहीसे कमी होऊन ते ३९.९ अंशावर आले. मागील दोन दिवसात उन्हाचा तडाखा असा वाढला की, सावलीत आसरा घेतला तरी उष्म्याची धग सहन करावी लागते. मागील तीन ते चार वर्षांतील उच्चांकी तापमानाची नोंद पाहिल्यास एप्रिलच्या मध्यानंतर मेच्या प्रारंभी हे तापमान गाठले गेल्याचे दिसून येते. १ मे २०१३ मध्ये नाशिकचे तापमान ४०.६ अंश होते. त्यापुढील वर्षांत म्हणजे २०१४ मध्ये १ आणि ७ मे या दोन दिवशी ४० अंश या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. गतवर्षी २० एप्रिल रोजी पारा ४०.६ अंशावर पोहोचला होता. यंदाही त्याची पुनरावृत्ती होत आहे. एप्रिलच्या मध्यावर ४०.३ अंशाची नोंद करणारे तापमान पुढे कोणती पातळी गाठणार, याबद्दल नागरिकांमध्ये धास्ती आहे.
जळगाव हा उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची नोंद होणारा जिल्हा. होळीनंतर या भागातील तापमानात वाढ होते. प्रारंभी फारशी न जाणवलेली उन्हाची झळ एव्हाना चांगलीच बसत आहे. जळगावचा पारा सध्या ४२ अंशावर गेला आहे. याच जिल्ह्यातील भुसावळमध्ये ४१.५ अंशाची नोंद झाली आहे. वाढत्या तापमानापासून बचावासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून केले जात आहे. शासकीय रुग्णालयांत उष्माघात कक्षांची स्थापना करून आरोग्य विभागाने सज्जता राखली आहे. धुळे जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४० अंशांवर पोहोचल्याने जनजीवनावर विपरीत परिणाम झाला आहे. या सर्व घडामोडींचा लाभ थंडपेय, ऊसाचा रस, कुल्फी व तत्सम वस्तुंची विक्री करणाऱ्या घटकांना झाला आहे. अंगाची लाही लाही होत असल्याने सर्वाना तो एकमेव आधार वाटतो, असे एकंदर वातावरण आहे.