अखिल भारतीय मराठी चित्रपटाच्या पंचवार्षिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दोन गटात वाद सुरू असले तरी अद्याप महामंडळाच्या निवडणुकीचा कुठलाच कार्यक्रम अद्याप अधिकृत जाहीर करण्यात आला नाही. या संदर्भातील कुठलाच पत्रव्यवहार महामंडळाच्यावतीने झालेला नाही. या सर्व पार्श्वभूमीवर मागण्या मान्य न झाल्यास आगामी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा महामंडळ उत्तर महाराष्ट्र नाशिक शाखा अध्यक्ष शाम लोंढे यांनी दिला आहे. याबाबत महामंडळाच्या वरिष्ठांना पत्र पाठवण्यात आलं आहे.

हेही वाचा- नाशिक : प्रकल्प पळवापळवीतून मुंबई, महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा डाव; छगन भुजबळ यांचा आरोप

नाशिकच्या कलाकरांना कमी दर्जाची वागणूक

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. याबाबत दोन वेगवेगळ्या गटांकडून १३ व २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असल्याची संभाव्य तारीख जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक संदर्भातील कुठलीही माहिती लेखी स्वरूपात प्रमुख कार्यालयातून अधिकृत किंवा अनिधकृत पत्र नाशिक विभागीय कार्यालयास आजपर्यंत प्राप्त झाले नाही. महामंडळाच्या उत्तर महाराष्ट्रातून पाच हजारांहून अधिक सभासद आहेत. उत्तर महाराष्ट्र अ वर्ग सभासद संख्या दोन हजारच्या आसपास आहे. एवढे मोठे योगदान असतांना मुख्य कार्यालयाकडून दुय्यम दर्जा पदोपदी दिला जात असून नाशिकच्या कलाकरांना कमी दर्जाची वागणूक दिली जात आहे. यामुळे मुख्य कार्यालयाकडून सभासद नोंदणी पासून ते बाकीच्या इतर कार्यालयीन कामकाजास विलंब होत असल्याकडे लोंढे यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा- नाशिक : ग्रामदेवता कालिका देवीच्या यात्रेवर पावसाचे संकट; मंदिर प्रशासन उभारणार भव्य जलरोधक मंडप

नाशिक विभागाची नवीन समिती स्थापन करणार

अगामी पंचवार्षिक निवडणूकाचे कुठलेही मार्गदर्शन, पत्रव्यवहार नाशिक शाखेबरोबर झालेला नाही. नाशिककरांवर अन्याय होत आहे. सर्वच गटातील सभासदांशी मैत्रीचे संबंध आहे. यातून उत्तर महाराष्ट्राचे हित जोपासणाऱ्या सदस्य किंवा गटासोबत जाण्याचा निर्णय नाशिकच्या कलावंतांनी घेतला आहे. नाशिककरांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. यासाठी लढा पुढे चालु ठेवण्याचा निर्धार लोंढे यांनी व्यक्त केला. दरम्यान, पुढील दोन दिवसात उत्तर महाराष्ट्रातील कलावंताच्या भवितव्यासाठी नाशिक विभागाची नवीन समिती स्थापना करत येऊन पुढील दिशा ठरवण्यात येईल. या सर्व प्रकाराबाबत महामंडळाच्या पदाधिकाऱ्यासोबत पत्रव्यवहार करण्यात येईल. या मागण्या मान्य न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा सुनील ढगे यांनी दिला.