जळगाव : राज्यात एप्रिलच्या अखेरीपासून वाढू लागलेला उन्हाचा तडाखा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आणखी तीव्र झाला असून, अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेने कहर केला आहे. दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट अधिक तीव्र होत असून, हवामान विभागाने मंगळवारी काही जिल्ह्यांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक या जिल्ह्यांमध्येही उष्ण लाटेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांत काही भागांत आकाश अंशतः ढगाळ राहिले असले तरी उकाड्यात कोणतीही दिलासा देणारी घट झालेली नाही. उलट दमट आणि कोरड्या हवामानामुळे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे. ग्रामीण भागांत दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत असून, शहरांमध्येही नागरिकांनी घराबाहेर पडणे कमी केले आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम जनजीवनाबरोबरच शेती, पशुधन आणि पाण्याच्या उपलब्धतेवरही होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक भागांत विहिरींची पातळी झपाट्याने घटत असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. राज्यात रविवारी जळगाव येथे सर्वाधिक ४४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर सोमवारी विदर्भातील अकोला येथे पारा तब्बल ४५.१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला. जळगावमध्येही तापमान ४३.३ अंशांवर कायम राहिले.
यामुळे तापमानात अचानक वाढ
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात आणि दक्षिण भारताच्या परिसरात सक्रिय झालेल्या विविध हवामान प्रणालींमुळे राज्यातील तापमानात अचानक बदल होत आहेत. मन्नारचा आखात आणि श्रीलंका परिसरात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे नैऋत्य बंगालच्या उपसागरात सोमवारी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचवेळी लक्षद्वीप बेटे आणि केरळ किनारपट्टीलगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय असून, त्या प्रणालीपासून उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यापर्यंत कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. हवामान घडामोडींमुळे वातावरणात उष्ण व कोरड्या वाऱ्यांचे प्रमाण वाढले असून, त्याचा थेट परिणाम तापमानवाढीवर होत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
हलक्या पावसाची शक्यता
काही भागांत उष्णतेमुळे केळीसह भाजीपाला पिकांचे नुकसान होऊ लागले असून, फळबागांनाही त्याचा फटका बसत आहे. पशुधनासाठी चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्यामुळे प्रशासनाने जिल्हा स्तरावर उष्णतेशी संबंधित आपत्कालीन उपाययोजना सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील बहुतांश भागांत तापमानात फारशी घट होण्याची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाच्या सरींची शक्यता असली तरी त्याचा उष्णतेवर फारसा परिणाम होणार नाही. परिणामी, नागरिकांना आणखी काही दिवस कडक उन्हाचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र आहे.
