मागील आठवडय़ात ३७ ते ३९ अंशादरम्यान असलेल्या पाऱ्याने उत्तर महाराष्ट्रात पुन्हा चाळिशी पार केली असून, रविवारी धुळे शहरात ४४.२ अंशाची नोंद झाली आहे. शहराचे हे दशकातील सर्वोच्च तापमान होय. दोन दिवसांत पारा अधिक वर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मागील आठवडय़ात उत्तर महाराष्ट्रास अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारांनी झोडपल्यामुळे चाळिशीपार गेलेले तापमान काहीसे खाली आले होते. त्यामुळे उकाडय़ाने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मागील दोन दिवसांत पुन्हा एकदा पारा वर गेला असून रविवारी धुळे शहराने दशकातील सर्वाधिक तापमानाची नोंद केली. ४ मे २००२ रोजी धुळ्यात ४६.२ अंश तापमानाची नोंद झाली होती. घराबाहेर न पडण्याचे धुळेकरांनी ठरविल्यामुळे रस्त्यांवर तुरळक वाहतूक दिसत होती. धुळे शहर व जिल्ह्य़ात तापमानात अधिक वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्यामुळे नागरिक अधिकच धास्तावले आहेत. धुळ्यापेक्षा नाशिक शहरात (४०.३) तापमान काहीसे कमी असले तरी जळगावमध्ये मात्र पारा ४२ ते ४४ अंशादरम्यान आहे.