मालेगाव : १५ फेब्रुवारी २६ रोजी नाशिक जिल्ह्याच्या मनमाड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरी येथे पहिले उत्तर महाराष्ट्र विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन होत आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक व माजी सनदी अधिकारी बी.जी.वाघ यांची निवड करण्यात आली आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य उपाध्यक्ष अर्जुन बागूल यांनी ही माहिती दिली आहे.
विद्रोही सांस्कृतिक चळवळ १९९९ पासून महाराष्ट्रभर कार्यरत आहे. महात्मा जोतिराव फुले यांनी ग्रंथकार सभेस पाठविलेले पत्र हा विद्रोहींचा वैचारिक जाहीरनामा आहे.अखिल भारतीय साहित्य संमेलन आणि महामंडळ यांचा आजवरचा व्यवहार हा विषमतावादी राहिला असल्याचा विद्रोहींचा आक्षेप आहे.
संयुक्त महाराष्ट्राचे सेनानी शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर, शाहीर अमर शेख, शाहीर वामनदादा कर्डक,शाहीर यशवंत चकोर, क्रांतीसिंह नाना पाटील, भाई उद्धवराव पाटील, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, यांना संमेलनासाठी साधे निमंत्रण न देणे; स्वातंत्र सैनिक व थोर गांधीवादी नेत्या नयनतारा सहेगल यांना यवतमाळला उद्घाटक म्हणून बोलावून नंतर अपमानित करणे, अशी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या विषमतावादाची असंख्य उदाहरणे आहेत. म्हणूनच विषमतावादी सांस्कृतिक विचारांचा विषारी प्रचार-प्रसार करणार्या संस्था, संघटना व संमेलनाच्या विरोधात भूमिका घेणे क्रमप्राप्त ठरते,असे बागूल यांनी म्हटले आहे.
विद्रोही सांस्कृतिक चळवळ जीवनाच्या सर्व क्षेत्रात समतावादी संस्कृती व साहित्य विचारांचा पुरस्कार करते. विद्रोही साहित्य चळवळीच्या वतीने आजवर मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, सोलापूर, नंदुरबार,वाशी, पुणे, मनमाड, धुळे, परभणी, बुलढाणा, हिंगोली, नाशिक, उदगीर, वर्धा, अमळनेर, छत्रपती संभाजी नगर इत्यादी ठिकाणी साहित्य संमेलने, एक आंतरराज्य (निपाणी), एक विद्रोही महिला साहित्य संमेलन (पुणे) यशस्वीपणे आयोजित करण्यात आले आहे. बाबुराव बागूल, कवी वाहरू सोनवणे, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. अजिज नदाफ, आत्माराम कनिराम राठोड, कॉ. तारा रेड्डी, तुळसी परब, डॉ. आ. ह. साळुंखे, संजय पवार, जयंत पवार, उर्मिला पवार, डॉ. श्रीराम गुंदेकर, डॉ. प्रतिभा अहिरे. विमल मोरे, डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. आनंद पाटील, गणेश विसपुते, चंद्रकांत वानखेडे, डॉ. वासुदेव मुलाटे , डॉ.अशोक राणा यांसारख्या सर्जनशील साहित्यिकांनी यापूर्वी विद्रोही साहित्य संमेलनाची अध्यक्षपदे भूषविली आहेत.
आता विभागीय पातळीवर पहिल्यांदाच हे संमेलन होत आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष सतिश केदारे हे असून मुख्य निमंत्रक अमिन नवाब शेख,खजिनदार रामदास पगारे तर,मुख्य संयोजक प्रा.डॉ.जे.वाय.इंगळे व गुरुकुमार निकाळे हे आहेत. आजच्या विद्वेषाच्या व संविधानिक लोकशाहीवर हल्ला होत असतानाच्या कालखंडात माणूसकीचा इतिहास, वारसा व त्याची पुर्नमांडणी करणार्या बी.जी.वाघ यांची उत्तर महाराष्ट्र विभागीय पहिले विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करताना आम्हाला आनंद होत असल्याचे स्वागताध्यक्ष सतिष केदारे व मुख्य निमंत्रक अमिन नवाब शेख यांनी सांगितले.
वाघ यांची ग्रंथसंपदा
नवनियुक्त अध्यक्ष बी.जी.वाघ यांच्या ग्रंथसपदेत अंतरीचे धावे,ओळख ताओवादाची,स्वतःला जाणा आणि ज्ञानी व्हा,ताओ-एक नैसर्गिक जीवनचक्र,अशांततेचे रंग,निसर्ग शासन समाज-एक मुक्त चिंतन,वळणवारी निलमोहर एकला,एका स्वप्नाची सुरुवात, अखेरचे स्वप्न, डॉ.आंबेडकरांचा अर्थविचार, ताओ एक जीवनशैली जगावे कसा ?,मी माझा संगती,एकला चलो रे !,विचारांच्या सावल्या,धर्मसत्ता की ज्ञानसत्ता,सत्याच्या वाटेवर आदींचा समावेश आहे.
इंग्रजी भाषेत देखील त्यांनी लेखन केलेले आहे. त्यात ड्रीम्स एंड रियालिटीएस, मेलिस टुवर्ड्स नन,ट्रेंकुलिटी हारमनी एंड बैलेंस, आर्ट ऑफ सर्वाइवल, द अनडिविडेड पाथ, लार्ड बुद्धा थॉट्स, डेवलपमेंट एंड ग्लोबलाइजेशन, कंटेंम्प्टरी इंटरनेशनल इकोनॉमिक्स इत्यादी पुस्तकांचा समावेश आहे.

