scorecardresearch

कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आता शिवसैनिकांना नोटिसा

शिंदे यांच्या समर्थनार्थ लावलेल्या फलकावर शाई फेकण्याचा प्रकार घडला होता. बंडखोरांविरोधात शिवसेनेच्या वतीने आंदोलन केले गेले

Shivsena flag
प्रतिनिधिक छायाचित्र

परवानगी नाकारल्याने शिंदे समर्थकांचे शक्तिप्रदर्शन टळले

नाशिक : राज्यातील सत्ता संघर्षांचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटू नयेत याकरिता पोलिसांनी विविध पातळीवर खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. त्या अंतर्गत जमावबंदी लागू करीत सभा, मिरवणुकीवर बंदी घातल्यानंतर आता गोंधळ घालण्याचा इतिहास असणाऱ्या सेना पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली जात आहे. यात काही महिन्यांपूर्वी भाजप कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या सेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांसह त्यांच्या समर्थकांना कारवाईचा इशारा दिला गेला आहे. दुसरीकडे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ शक्तिप्रदर्शन करीत सेनेला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत असणाऱ्यांना चाप लावला गेला आहे.

शिवसेनेतील बंडखोरीमुळे राजकीय पटलावर पडसाद उमटत आहेत. दादा भुसे आणि सुहास कांदे हे सेना आमदार एकनाथ शिंदे गटास जाऊन मिळाले आहेत. शिंदे यांच्या समर्थनार्थ लावलेल्या फलकावर शाई फेकण्याचा प्रकार घडला होता. बंडखोरांविरोधात शिवसेनेच्या वतीने आंदोलन केले गेले. त्यास प्रत्युत्तर देण्यासाठी मंगळवारी शिंदे समर्थक गटाने द्वारका येथे शक्तिप्रदर्शनाची तयारी केली होती. त्याकरिता शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी द्वारका परिसरात एकत्रित होण्यासाठी परवानगी मागितली.

तथापि ती नाकारली गेल्याने शक्तिप्रदर्शन करता आले नसल्याचे वैद्यकीय मदत कक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख योगेश म्हस्के यांनी सांगितले. बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे विविध गटांवर पोलिसांना नजर ठेवावी लागत आहे. मागील काही दिवसांतील घटनाक्रम लक्षात घेऊन १५ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली. या काळात दगड, शस्त्र, काठय़ा अशा वस्तू बाळगणे, कोणत्याही व्यक्तीचे, चित्राचे, प्रतीकात्मक प्रेताचे अथवा पुढाऱ्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन, दहन, घोषणाबाजी करणे, वाद्य वाजविण्यास मनाई केली गेली. पूर्वपरवानगीशिवाय सभा आणि मिरवणुकीवर बंदी आहे.

राज्यातील सत्ता नाटय़ात आता भाजपचाही प्रवेश होत आहे. त्यामुळे राजकीय संघर्षांला वेगळे वळण मिळू नये म्हणून पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. यापूर्वी विविध कारणावरून सेना-भाजपमध्ये वादविवाद झाले आहेत. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यावरील कारवाईवेळी काही शिवसैनिकांनी भाजप कार्यालयाची तोडफोड केली होती. त्यास सिडकोतील भाजप नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी सेना कार्यालयावर दगडफेक करीत प्रत्युत्तर दिल्याचा ताजा इतिहास आहे. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या शिवसैनिकांना वेसण घालण्यासाठी पावले उचलली आहेत. त्या अंतर्गत अंबड पोलिसांनी शिवसेनेचे बाळा दराडे आणि माजी नगरसेवक दीपक दातीर यांना नोटीस बजावली.

भाजप कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणात दोघांवर गुन्हा दाखल आहे. उभयतांनी पूर्वी तोडफोड, जाळपोळ यासारखे कृत्य केले असल्याने तेव्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. संबंधितांनी किंवा त्यांच्या समर्थकांनी पुन्हा असे कृत्य करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी तंबी दिली गेली आहे. या नोटिसांबाबत सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले. राजकीय संघर्षांत शहरात शांतता कायम राखण्यासाठी पोलीस यंत्रणेकडून प्रयत्न सुरू आहेत.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Notice to shiv sainiks to maintain law and order zws

ताज्या बातम्या