शहरात सोनसाखळी चोरीच्या घटना वाढत असताना यात दुचाकीवरील चोरट्याला आता महिलेची साथ मिळाल्याचे उघड झाले आहे. आडगावच्या कोणार्कनगर भागात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवर आलेल्या संशयित व्यक्ती व महिलेने पायी जाणाऱ्या महिलेची सोन्याची पोत खेचून नेली. काही वेळात पुन्हा तसाच प्रकार अन्य महिलेबाबत घडला.

हेही वाचा >>> सप्तश्रृंग गडावरील पायऱ्यांवर बोकड बळीस सशर्त परवानगी ; उच्च न्यायालयाचा निकाल

या बाबत राधिका मनसुरे यांनी तक्रार दिली. मनसुरे या शुक्रवारी मुलाला संध्याकाळी शिकवणीला सोडण्यासाठी पायी जात असताना ही घटना घडली. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पांढऱ्या रंगाच्या दुुचाकीवरून संशयित व्यक्ती व महिला जवळ आली. त्यांनी १५ हजार ५०० रुपये किंमतीची सोन्याची पोत हिसकावून क्षणार्धात पलायन केले. २० ते २५ मिनिटाच्या अंतराने पुन्हा तसाच प्रकार मंगला जंजाळकर यांच्याबाबत घडला. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवर आलेल्या संशयितांनी त्यांच्या गळ्यातील पोत हिसकावण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही घटनांमध्ये संशयित एकच असण्याची शक्यता आहे. दुचाकीस्वार चोरट्याने रेनकोट व टोपी परिधान केलेली होती तर संशयित महिलेच्या चेहेऱ्यावर कापड होते. पोलिसांनी आसपासच्या भागातील सीसी टीव्हीचे छायाचित्रण मिळवले. पावसामुळे सायंकाळी अंधार दाटलेला होता. त्यामुळे चित्रणातून संशयितांचा चेहेरा, वाहन क्रमांकाची स्पष्टता झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा >>> मान्यवरांच्या उपस्थितीत ‘गौदागौरव’चे प्रकाशन

दरम्यान, मागील काही वर्षांपासून वेगवेगळ्या भागात सातत्याने सोनसाखळी खेचून नेण्याचे प्रकार घडत आहे. त्यामध्ये आजवर शेकडो महिलांचे लाखो रुपयांचे दागिने चोरून नेण्यात आले. दुचाकीवरील चोरटे पायी निघालेल्या महिलांना हेरून त्यांचे सोन्याचे मंगळसूत्र वा पोत ओरबाडून नेतात. अशा घटनांमध्ये दोन पुरूष चोरट्यांचा सहभाग असल्याचे दिसून येते. काही प्रकरणांचा छटा लावण्यात पोलिसांना यश आलेले आहे. त्यात पकडण्यात आलेले संशयित सर्व पुरूषच आहेत. आडगाव शिवारातील उपरोक्त घटनेत दुचाकीवरील पुरूष चोरट्याला महिलेची साथ लाभली. यापूर्वी तसाच प्रकार अंबड भागात घडल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.