नाशिक – उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या सप्तशृंग गडावरील सप्तशृंगी देवीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया केल्यानंतर कित्येक वर्षांपासून साचलेला १८०० किलो शेंदूर लेपणचा कवच काढण्यात आला आहे. हा शेंदूर आता पहिल्या पायरीच्या प्रवेशद्वाराजवळ कमानीच्या मध्यभागी स्तंभ उभा करून भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. हा स्तंभ उभा केल्यामुळे या जागी अडचण निर्माण होऊन दुर्घटना होऊ शकते. जागेची अडचण निर्माण होऊन चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना होऊ शकते, अशी भीती भाविकांनी व्यक्त केली आहे. हे काम त्वरित बंद करण्याची मागणी केली आहे.
सप्तशृंग गडावर वर्षभरातून दोन वेळेस यात्रा भरत असतात. एक चैत्रोत्सव आणि दुसरा नवरात्र उत्सव. या दरम्यान लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. पहिल्या पायरीला भाविक महिषासुरमर्दिनीच्या चरणी नतमस्तक होऊन याच मार्गाने दर्शनाला जात असतात. या ठिकाणी यात्रा उत्सव काळात भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दोन ते तीन ठिकाणी धातूशोधक यंत्रणा उभी केली जाते. त्यामुळे जागा अपुरी पडते. त्यातच हा स्तंभ मध्यभागी उभा केल्याने जागेची अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.




हेही वाचा – खडसे यांच्या स्वार्थीपणामुळेच जावई विनाकारण तुरुंगात; गिरीश महाजन यांचा आरोप
या कामाविषयी विश्वस्त मंडळाने ग्रामपंचायतीला कोणतीही कल्पना दिलेली नाही. ग्रामस्थ आणि व्यावसायिकांना कुठल्याही प्रकारे याबाबत माहिती न देता, विश्वासात न घेता परस्पर काम सुरू केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत कुठल्याही अधिकाऱ्यांचा याबाबत सल्ला किवा चर्चा न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा स्तंभ मध्यभागी न घेता दीपमाळेच्या बाजूला बसविण्यात यावा, जेणेकरून या भागात अडचण निर्माण होणार नाही. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे तसेच विश्वस्तांनी मनमानी कारभार थांबवावा, अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे.
सप्तश्रृंगी देवीच्या प्रवेशद्वाराजवळ मध्यभागी सदरचा शेंदूर स्तंभ उभारण्यात येणार आहे. याठिकाणी गर्दीत अडचण निर्माण होऊ शकते. स्तंभ उभारण्यास विरोध नाही. इतर ठिकाणी तो उभा करावा. भाविष्याचा विचार करून निर्णय घ्यावा, याबाबत ग्रामपंचायतीमार्फत पत्र देवून विश्वस्तांशी चर्चा करण्यात येईल. – रमेश पवार (सरपंच, सप्तश्रृंग गड)
हेही वाचा – पंचवटीत गोळीबार करणाऱ्या टोळीवर मोक्का, शहर पोलिसांची गुन्हेगारांविरुध्द कठोर कारवाई
शेंदूर स्तंभ मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पहिल्या पायरीजवळ होत आहे. या स्तंभामुळे यात्रा काळात किंवा अन्य वेळी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. यासंदर्भात पाहणी करूनच निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिकांकडून केवळ विरोधासाठी विरोध होत आहे. – ॲड. ललित निकम (विश्वस्त)