नाशिक: प्रभागातील एखाद्या भागातील मतदारांची नावे थेट दुसऱ्या प्रभागात, कुठे जिवंत लोकांची नावे गायब आणि मरण पावलेल्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट, अशा विविध तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडत आहे. प्रारूप मतदार यादीतील घोळ लक्षात घेऊन माजी नगरसेवक आणि इच्छुकांनी मुदतीत हरकती, आक्षेप नोंदविण्याची धडपड सुरू आहे. मतदार याद्यांमध्ये घोळाची परंपरा यंदाही कायम राहिल्याची भावना उमटत आहे. वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन पालिका आयुक्तांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्याचे निर्देश दिले.
विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे आणि पत्ते कायम ठेवले जातात. प्रारूप मतदार याद्या तयार करताना काही त्रुटी राहिल्याचे सांगितले जाते. याद्या प्रसिद्ध करण्याच्या दिवशीच काही प्रभागातील याद्यांमध्ये गोंधळ झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्या आभासी प्रणालीन्वये प्रसिद्ध करताना प्रशासनाची दमछाक झाली होती. त्यावर १ जुलैपर्यंत हरकती आणि आक्षेप नोंदविण्यास मुदत आहे. ही घटिका समीप येत असताना याद्यांमधील घोळाबाबत तक्रारी वाढत आहे. मंगळवारी शिवसेनेचे माजी गटनेते विलास शिंदे आणि पाच ते सहा माजी नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात झालेला गोंधळ लेखी स्वरूपात प्रशासनासमोर मांडल्याचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी सांगितले.
काही प्रभागात परिसर बदलला गेला आहे. गंगापूर रोड, सिडको, पाथर्डी, नाशिकरोड येथील प्रभागांच्या यादीत घोळ आहे. काही प्रभागातील काही परिसर थेट दुसऱ्या प्रभागात समाविष्ट केले गेल्याचे काहींचे म्हणणे आहे. त्यामुळे तेथील मतदार भलत्याच प्रभागात समाविष्ट झाले. आम आदमी पक्षाच्या माजी पदाधिकाऱ्यांनी प्रारूप यादीत जिवंत व्यक्तींची नावे सापडत नाही. पण मरण पावलेल्यांची नावे असल्याची तक्रार केली. यादी प्रसिद्ध होतेवेळी एका प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्याच प्रभागात गेल्याचे सांगितले जात होते. त्याची प्रचीती सध्या अनेकांना येत आहे.
दरम्यान, मोठय़ा प्रमाणात तक्रारी होत असल्याने पालिका आयुक्त रमेश पवार यांनी सकाळी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. प्राप्त तक्रारींबाबत विभागीय अधिकारी, उपायुक्त, निरीक्षक, लिपिक आदींनी प्रत्यक्ष स्थळ भेट देऊन पाहणी करण्याची सूचना केली. नावांबाबतच्या तक्रारींबाबत संकेतस्थळावर पडताळणी करता येईल.