महामार्ग स्थानकात बसची नासधूस

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या संपामुळे प्रवासी वेठीस धरले गेले असताना शहरातून पुणे आणि धुळे या दोन मार्गावर शिवशाही बससेवा सुरू करताना अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. चार दिवसांपासून बस सेवा बंद असल्याने दोन मार्गावर सेवा सुरू झाल्याविषयी प्रवासी अनभिज्ञ होते. त्यामुळे ठक्कर बजार स्थानकावर दोन्ही ठिकाणी जाणाऱ्या पहिल्या बसला बरीच प्रतीक्षा करूनही पुरेसे प्रवासी मिळाले नाही. दुसरीकडे, महामार्ग बस स्थानकात उभ्या असलेल्या दोन शिवशाही गाडय़ांची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली.

परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. खासगी वाहतुकदारांनी या संधीचा लाभ उठवत प्रवासी भाडय़ात कमालीची वाढ केली. दिवाळीनिमित्त गावी आलेले अनेक जण संपामुळे अडकून पडले आहेत. बस उपलब्ध नसल्याने अनेकांना खासगी मालवाहू वाहनांमधून प्रवासाची वेळ आली. एसटी कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवरून सामान्यांमध्ये रोष आहे. या स्थितीत मुख्यालयाच्या आदेशानुसार गुरूवारी अधिकाऱ्यांनी काही मार्गावर शिवशाही बससेवा सुरू करण्याचा प्रयत्न केला. दुपारी साडेतीन, चार वाजता दोन बस ठक्कर स्थानकात उभ्या करण्यात आल्या. या बसचे चालक खासगी आहेत. पण, प्रवासाची तिकीटे परिवहन महामंडळाचे वाहक काढतात. काही मार्गावर विनाथांबा शिवशाही धावतात. त्यामध्ये वाहक नसतो. त्यांचे तिकीट स्थानकावर आधीच काढले जाते. ही व्यवस्था सांभाळण्यासाठी मनुष्यबळाची गरज असते. सध्या तेच नसल्याने सेवा सुरू करताना अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यात एकूण ५३ शिवशाही बस आहेत. त्या पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी पुरेसे वाहक नसल्याचे कारण अधिकाऱ्यांनी पुढे केले आहे. काही मार्गावर बस सेवा सुरू होत असल्याची माहिती प्रवाशांना नव्हती. त्यामुळे पहिल्या दोन्ही बसला प्रवाश्यांची वाट बघावी लागली. या बस रस्त्यात रोखल्या जाऊ शकतात. त्यामुळे चालकही पोलीस संरक्षणाची मागणी करीत होते.

खतपाणी घालणाऱ्यांचे निलंबन

न्यायालयाच्या आदेशानंतरही संप सुरूच ठेवणाऱ्यांविरोधात महामंडळाने कठोर भूमिका घेतली आहे. प्रारंभापासून संपाला खतपाणी घालणाऱ्या जवळपास ५६ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हळूहळू या कारवाईची व्याप्ती वाढविली जाणार आहे. संप सुरू करताना ज्यांनी निवेदने दिली, कर्मचाऱ्यांनी कामावर जाऊ नये म्हणून पुढाकार घेतला अशा कामगार संघटनेच्या प्रतिनिधींचा निलंबित झालेल्यांमध्ये समावेश असण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील निलंबित कर्मचाऱ्यांची आकडेवारी व यादी अद्याप प्राप्त झाली नसल्याचे विभागीय कार्यालयाकडून सांगण्यात आले.