नाशिक – भारत हा तरुण देश असून देशावर जगाला पुढे नेण्याची जबाबदारी आहे. यासाठी युवा वर्गाला कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. २०४७ मध्ये देश पूर्णपणे विकसित होण्यासाठी शिक्षणासोबत वाचनाची सवय गरजेची आहे. वाचनातून विकास होतो. तसेच देशाला पुढे नेण्यासाठी राजकारण्यांविषयी झालेले गैरसमज खोडत दृष्टी बदलायला हवी. राजकारणात तसेच राजकारण्यांकडे युवा पिढीने सकारात्मक पाहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केले.
येथील सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्याच्या हस्ते कार्यक्षम खासदार पुरस्काराने धाराशिवचे खा. ओमराजे निंबाळकर यांना गौरवण्यात आले. रोख रक्कम, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. खा. निंबाळकर यांनी पुरस्काराची रक्कम वाचनालयाला परत केली.
यावेळी बोलताना नार्वेकर यांनी सांगितले की, भारत तरुण देश आहे. या देशावर जगाला पुढे नेण्याची जबाबदारी आहे. २०४७ मध्ये देश पूर्ण विकसित होणार आहे. यासाठी प्रत्येकाने वाचनाची सवय लावून घेणे गरजेचे आहे. वाचनाच्या माध्यमातून माहिती मिळते. वाचनातून विचार घडण्याची ताकद आहे. ज्या समाजात विचार घडवण्याची ताकद आहे तो समाज मागे राहणार नाही, असे नार्वेकर यांनी सांगितले. विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करताना न्याय देत आहे. देशाला पुढे नेण्यासाठी युवकांनी राजकारणाकडे तसेच राजकारण्यांविषयी झालेले समज खोडून काढण्याची गरज असल्याचे त्यांनी मांडली.
सत्काराला उत्तर देताना खा. निंबाळकर यांनी सांगितले, मी राजकारण आणि राजकारण्यांचा तिरस्कार करणारी व्यक्ती होतो. आयुष्यातील अपघात म्हणजे वडिलांच्या हत्येनंतर मी त्यांचा विचार जिवंत राहावा यासाठी राजकारणात आलो. विधानसभेत जायचो तेव्हा सुरक्षारक्षक मला मध्ये जाऊ देत नव्हते. खासदार झाल्यावर हीच तऱ्हा; कारण काय तर राजकारणी व्यक्तीप्रमाणे पेहराव नाही. मी रंगीत कपडे घालायला पसंती देतो.
मला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख यांचा सहवास लाभला. ही माणसे जवळून पाहिली. त्यांच्यासारखे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यात मी यशस्वी झालो. मला निवडणुकीच्या कामात सामान्य माणसांची मदत झाली. राजकारण्यांवर टीका होत असते, त्याकडे लक्ष न देता आपण आपले काम प्रामाणिकपणे करत राहणे गरजेचे आहे. मी लोकसभेत बोलताना मराठीचा वापर करतो, कारण मी कोणासाठी काय बोलतो हे त्याला समजले पाहिजे, यासाठी काम करत आहे. लोकशाहीचा आत्मा म्हणजे आपण आपल्या लोकांसाठी समर्पित असतो. राजकारणात दिवस बदलत राहतात, असेही त्यांनी सूचित केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांत यश मिळाले नाही, कारण निवडणुकीत पैशाचा वापर झाला. जे पैसे वाटतात ते समर्पित भावनेने काम करत नाहीत, ते वाटलेले पैसे वसूल करत असतात. यामध्ये जनतेचे नुकसान आहे. वाचनालयाच्या वतीने दिलेला पुरस्कार हा जबाबदारीचे ओझे वाढवणारा आहे. वाचन महत्त्वाचे आहे. वाचनासोबत आपण आपले आरोग्यही जपले पाहिजे, असे खा. निंबाळकर यांनी सांगितले. पुरस्कार सोहळ्यास वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार, आमदार यांना पुरस्कार द्यावेत का?
कार्यक्षम आमदार, खासदार पुरस्कार देण्यात यावेत का? हा संशोधनाचा विषय आहे. नवमाध्यमांवर प्रतिक्रियांचा पडलेला पाऊस पाहून माणसाने काम करावे की करू नये? आमदार, खासदार टीकेचे धनी असताना त्यांना पुरस्कार द्यावेत का? असा प्रश्न पडतो. आमदार झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यासवर्ग घेतला. ‘महत्त्वाचे आधी बोला’ हे त्यांनी शिकवल्याने याचा पुढील काळात फायदा झाला. नवखा असल्याने सगळ्यांकडून शिकायला मिळत आहे. – खा. राजाभाऊ वाजे, निवड समिती सदस्य.
