scorecardresearch

थकबाकीदार दीड लाख, प्रतिसाद १५१४ जणांचा; महावितरणच्या अभय योजनेची स्थिती

कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित ग्राहकांकडील थकबाकीचा भरणा करून त्यांना संधी आणि सवलत देण्यासाठी विलासराव देशमुख अभय योजनेंतर्गत महावितरणच्या नाशिक परिमंडलातील १५१४ ग्राहकांनी लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत.

नाशिक: कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित ग्राहकांकडील थकबाकीचा भरणा करून त्यांना संधी आणि सवलत देण्यासाठी विलासराव देशमुख अभय योजनेंतर्गत महावितरणच्या नाशिक परिमंडलातील १५१४ ग्राहकांनी लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. जिल्ह्यात कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांची संख्या एक लाख ४२ हजारहून अधिक आहे. त्यांच्याकडे मूळ थकबाकीपोटी ८५ कोटी रुपये थकीत आहेत. एकूण थकबाकीदार ग्राहक लक्षात घेता अभय योजनेत सहभागी झालेल्यांचे प्रमाण दीड टक्काही नसल्याचे दिसत आहे.

अभय योजनेत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून सोबत २८३ ग्राहक या योजनेचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त झाले आहेत. त्यांनी ४६ लाख ३९ हजार रुपयांचा भरणा केला. जिल्ह्यात कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या एक लाख ४२ हजार २२८ ग्राहकांकडे मूळ थकबाकी ८५ कोटी ३८ लाख इतकी आहे. त्यावरील व्याज व दंड रकमेत ११ कोटी ९२ लाख रुपयांची सवलत आणि  पुनजरेडणीची संधी मिळणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील ४८३ ग्राहकांनी लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल केले असून  ११२ ग्राहकांनी  २५ लाख २७ हजार रुपयांचा भरणा केला. याद्वारे संबंधितांना वीज पुनजरेडणीची संधी उपलब्ध झाली. अनेकदा प्रयत्न करूनही वीज देयक न भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित करावा लागतो.

संबंधितांकडील थकबाकी वसूल होईल व ग्राहकांना लाभ मिळेल या हेतूने उपरोक्त योजना जाहीर केली आहे. तिचा कालावधी ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत असून ही योजना कृषी ग्राहक वगळून सर्व वर्गवारीतील ग्राहकांना लागू असेल. थकबाकी वसुलीसाठी न्यायालयात दावा दाखल केला असेल आणि ग्राहकांना वरील सवलतीचा लाभ घ्यावयाचा असेल तर अशा ग्राहकांनी महावितरणला दाव्याचा खर्च देणे अत्यावश्यक राहील.

ज्या ठिकाणी महावितरणच्या बाजूने न्यायालयाने आदेश दिलेला असेल व १२ वर्षांच्या वर कालावधी लोटला नसेल व लाभार्थी ग्राहकाने कोठेही अपील केले नसेल तर अशा ग्राहकांना या योजनेचा फायदा घेता येईल. ज्या ग्राहकांचा न्यायालयात वाद चालू असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. ही योजना फ्रेंचायसीमधील ग्राहकांनासुद्धा लागू असेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी व माहितीसाठी नजीकच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

सवलती कोणत्या ?

या योजनेत थकबाकीदारांना थकबाकीची  मूळ रक्कम एकरकमी भरावी लागेल. त्यामुळे त्यांच्या थकबाकीवरील  व्याज आणि विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात येईल. थकबाकीदार ग्राहकांनी मुद्दलाची रक्कम एकरकमी भरल्यास उच्चदाब ग्राहकांना पाच आणि लघुदाब ग्राहकांना १० टक्के थकीत मुद्दल रकमेत अधिकची सवलत मिळेल. ग्राहकांना रक्कम सुलभ हप्तय़ांने भरावयाची असल्यास मुद्दलाच्या ३० टक्के रक्कम एकरकमी भरणे अत्यावश्यक आहे. त्यानंतर त्यांना उर्वरित रक्कम सहा हप्तय़ात भरता येईल.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: One and half lakh arrears response people status of msedcl abhay yojana ysh

ताज्या बातम्या