scorecardresearch

नाशिक : ‘जाणता वाघोबा’ उपक्रमांतर्गत शंभर बिबट्यादूत कार्यरत

जिल्ह्यात ‘जाणता वाघोबा’ उपक्रमांतर्गत ३० गावांमध्ये बिबट्या-मानव सहजीवनाबाबत जागरुकता वाढविण्यात येत असून ‘बिबट्यादूतां’ची फौज तयार होत आहे.

Janta Waghoba nashik
‘जाणता वाघोबा’ उपक्रमांतर्गत शंभर बिबट्यादूत कार्यरत (संग्रहित छायाचित्र)

मानव आणि वन्यजीव यांच्यातील वनसंघर्ष वाढत असतांना ही परिस्थिती हाताळण्यासाठी काय करावे, याविषयी जागरुकता वाढण्याकरिता, वन्यजीव संघर्षाला नियंत्रणात आणण्यासाठी बिबट्या-मानव सहजीवनाचे धडे गावपातळीवर देण्यात येत आहेत. जिल्ह्यात ‘जाणता वाघोबा’ उपक्रमांतर्गत ३० गावांमध्ये बिबट्या-मानव सहजीवनाबाबत जागरुकता वाढविण्यात येत असून ‘बिबट्यादूतां’ची फौज तयार होत आहे. सध्या विल्होळी आणि आंबेबहुला या दोन गावांत शंभर विद्यार्थी बिबट्यादूत म्हणून कार्य करीत आहेत.

नाशिक पश्चिम वन विभाग, वाइल्ड लाइफ कॉन्झर्वेशन सोसायटी आणि कॉन्झर्वेशन लिडरशीप प्रोग्राम यांच्या सहकार्याने ‘जाणता वाघोबा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. २०२० मध्ये नाशिकच्या दारणा खोऱ्यात बिबट्यांचे अचानक हल्ले सुरू झाल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. तिथल्या गावांचा अभ्यास केल्यानंतर ऊस शेतीमुळे हे हल्ले होत असल्याचे वन विभागाच्या लक्षात आले. तेव्हा, १२ बिबटे पिंजऱ्यात अडकल्यावर नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय झाला. यापूर्वी ‘जुन्नर पॅटर्न’ म्हणून हा उपक्रम प्रचलित झाला होता. त्यानुसार वन विभागाने प्रबोधन करून गावपातळीवर बिबट्या-मानव सहजीवनाबाबत ग्रामस्थांशी चर्चा करून उपक्रमाला सुरुवात केली. या अंतर्गत पश्चिम वनविभाग कार्यालयात माध्यमांशी चर्चा करण्यात आली. यावेळी वनपरीक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, मानद वन्यजीवरक्षक वैभव भोगले आणि अक्षय मांडवकर उपस्थित होते.

हेही वाचा – धनुषसह अतिप्रगत तोफा लवकरच संरक्षण दलात; स्वदेशी सामग्रीने तोफखाना दलाच्या आधुनिकीकरणाला वेग

हेही वाचा – समर्थ सेवामार्गाकडून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम; कृषी महोत्सव समारोपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

भोगले यांनी ‘जाणता वाघोबा’ उपक्रमासंदर्भात माहिती दिली. या उपक्रमांतर्गत बिबट्याचा बदललेला अधिवास, जीवनशैली, हल्ल्याचे कारण आणि पद्धतीबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. चित्रफित आणि माहिती फलकच्या माध्यमातून विद्यार्थ्यंना घरी तसेच गावात प्रबोधनासाठी माहिती दिली जात आहे. सध्या पर्यावरणातील बदल, सिमेंटचे जंगल वाढत असल्याने बिबट्या आता घराजवळच्या जंगलात, शेतात येत आहे. त्याच्या समवेत सुरक्षितरित्या जगण्याबाबत जागरुक केले जात आहे. त्यासाठी वन्यजीव गावांमध्ये मुक्काम करीत असून, शाळा-महाविद्यालयात ‘बिबट्यादूत’ तयार होत आहेत. पुढील टप्प्यात हे दूत वन्यजीव संवर्धनाची विशेष जबाबदारी पार पाडतील. जुन्नरमध्ये हा पॅटर्न यशस्वी झाला असून नाशिकमधल्या संघर्षावर देखील ही प्रभावी मात्रा ठरेल, असा आशावाद वनाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 11:19 IST
ताज्या बातम्या