कांद्याला योग्य भाव मिळत नाही त्यामुळे कर्जबाजारीपणाला कंटाळून नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. मुरलीधर भीमा लहाने (वय ३२, रा. बेजगाव) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव असून घराजवळील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. कांद्याला योग्य भाव मिळत नाही, त्यात जिल्हा बँक आणि सोसायटीच्या कर्जाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

मुरलीधर लहाने यांच्या पश्चात आई व पत्नी असा परिवार आहे. मनमाड पोलिस ठाण्यात याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गेल्या पंधरवड्यातील नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्याची ही तिसरी आत्महत्या आहे. तालुक्यातील ढेकू येथील शिवाजी सूर्यवंशी यांनी वाढते कर्ज व कांद्याला कमी भाव मिळाल्यामुळे आपल्या शेतात विष पिऊन आत्महत्या केली होती. तर गोंदेगाव येथील भगवान बोडके (वय ३२) या तरुण शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून विहीरीत उडी टाकून आत्महत्या केली होती.