नाशिक : उदध्वस्त झालेल्या राज्यातील उद्योजकांना नवसंजीवनी देवून औद्योगिक क्षेत्राला स्थैर्य देण्यासाठी काँग्रेसचा औद्योगिक विभाग नियोजनबद्धपणे कार्यरत राहणार असून राज्यात एक हजार नवीन उद्योजक तयार करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेस औद्योगिक विभागाचे अध्यक्ष डॉ. हेमंत सोनारे यांनी दिली आहे.
करोना महामारीने कंबरडे मोडलेल्या उद्योजकांना केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे फटका बसला आहे, राज्यातील बहुतांश उद्योग आणि पर्यायाने उद्योजक, त्यांच्यावर अवलंबून असणारे लघुउद्योजक, लाखो कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय अक्षरशः देशोधडीला लागले आहेत. बेरोजगारी सध्या वेगाने वाढत आहे. या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी औद्योगिक क्षेत्राला सावरणे आवश्यक आहे. हे ओळखून काँग्रेसचा औद्योगिक विभाग पुढे सरसावला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात काँग्रेसचा औद्योगिक विभाग सल्ला व मार्गदर्शन केंद्र स्थापन करणार असल्याचे सोनारे यांनी सांगितले. पूर्णपणे बंद पडलेले.
आजारी उद्योजकांसह संघर्ष करून आजही टिकून असलेला उद्योजक आणि यशस्वी उद्योजकांचा सेतू कार्यरत करण्याचे काम सुरू असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर नाशिक शहर आणि जिल्हा काँग्रेस औद्योगिक विभागाचे काम प्रभावीपणे होण्यासाठी सक्षम कार्यकारिणी निवडण्यात आली. यावेळी डॉ. सोनारे यांच्या समवेत नाशिक जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष प्रसाद धारणगावकर, सचिव नीलेश मोरे, उपाध्यक्ष जितेंद्र पावसे सदस्य स्नेहल देशपांडे, शहराध्यक्ष अनंत बारहाते हे उपस्थित होते. नूतन कार्यकारिणीचा डॉ. सोनारे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.