नाशिक – देशभरात अशा अनेक खासगी कंपन्या आहेत, ज्या कंपन्यांमध्ये रोजगार मिळावा, नोकरी मिळावी अशी अनेक तरुणांची अपेक्षा असते. त्यापैकी एक कंपनी म्हणजे ‘ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड’ ही होय. देशातील महत्वपूर्ण कंपन्यांपैकी ओएनजीसी ही एक आहे. त्यामुळे या कंपनीत नोकरीची काही संधी आहे का, याविषयी युवावर्गात उत्सुकता असते. या कंपनीने २४ केंद्रांवर ३०४७ ॲप्रेंटिस पदांसाठी महाभरती जाहीर केली आहे. या महाभरतीचे वैशिष्ट्ये म्हणजे उमेदवारांची निवड लेखी परीक्षेनुसार नव्हे तर, गुणवत्तेनुसार होणार आहे.

ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (ओएनजीसी) राष्ट्रीय कौशल्य विकास उपक्रमांतर्गत ॲप्रेंटिस ॲक्ट, १९६१ नुसार ही भरती प्रक्रिया होणार आहे. या महाभरतीसाठी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे – १) ट्रेड ॲप्रेंटिस (एनएपीएस): १० वी, १२ वी किंवा मान्यताप्राप्त आयटीआय उत्तीर्ण ( फिटर, इलेक्ट्रिशियन, कोपा, डिझेल मेकॅनिक, ड्राफ्ट्समन इत्यादी), २) डिप्लोमा ॲप्रेंटिस (एनएटीएस) – संबंधित शाखेतील तीन वर्षांचा इंजिनिअरिंग डिप्लोमा. ३) ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस (एनएटीएस) – बी.ए., बी.कॉम., बी.एससी., बी.बी.ए. किंवा बी.ई./बी.टेक.

ही महाभरती होणार असलेल्या केंद्रांमध्ये १) मुंबई क्षेत्र: ४८२ जागा (मुंबई, उरण, पनवेल, न्हावा, हझिरा, गोवा), २) नॉर्दर्न क्षेत्र: १९१ जागा (डेहराडून, दिल्ली, जोधपूर, ओव्हीएल दिल्ली), ३) वेस्टर्न क्षेत्र: ११६६ जागा (अहमदाबाद, अंकलेश्वर, मेहसाणा, बडोदा, कँबे), ४) ईस्टर्न क्षेत्र: ६७४ जागा (जोरहाट, नाझिरा, शिवसागर, सिलचर), ५) साउदर्न क्षेत्र: २६९ जागा (चेन्नई, काकीनाडा, काराईकल, राजमुंद्री), ६) सेंट्रल क्षेत्र: २६७ जागा (अगरतळा, बोकारो, कोलकाता) यांचा समावेश आहे.

या भरतीसाठी केवळ ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ट्रेड ॲप्रेंटिस (NAPS): apprenticeshipindia.gov.in या पोर्टलवरून उमेदवारांना अर्ज करावा लागणार आहे. पदवीधर/डिप्लोमा ॲप्रेंटिससाठी (NATS) nats.education.gov.in या पोर्टलवरून अर्ज भरावा लागणार आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० नोव्हेंबर आहे. महत्वाचे म्हणजे निकाल जाहीर होण्याची तारीखही जाहीर करण्या आली आहे. ही तारीख १५ डिसेंबर आहे.

वयोमर्यादा आणि विद्यावेतन

अर्जदारांचे वय २९ नोव्हेंबर २०२६ रोजी किमान १८ वर्षे आणि कमाल २४ वर्षे असावे (जन्म २९.११.२००२ ते २९.११.२००८ दरम्यान असावा). मागासवर्गीय उमेदवारांसाठी (एससी/एसटी) पाच वर्षे, ओबीसी प्रवर्गासाठी तीन वर्षे आणि अपंगांसाठी १० ते १५ वर्षांपर्यंत वयोमर्यादा शिथील आहे.निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार ८२०० ते १२३०० रुपयांपर्यंत दर महिन्याला विद्यावेतन दिले जाईल. प्रशिक्षणाचा कालावधी १२ महिन्यांचा आहे. उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. लेखी परीक्षेला सामोरे न जाता केवळ पदवी/डिप्लोमा/आयटीआय गुणांच्या गुणवत्तेनुसार निवड केली जाणार अस्लयाने ही एक मोठी संधी आहे. अधिक माहितीसाठी ‘ओएनजीसी’च्या ongcindia.com अथवा ongcapprentices.ongc.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.