नाशिक : केंद्र सरकारने कांद्यासाठी निश्चित केलेल्या शिवार खरेदीच्या मार्गदर्शक तत्त्वाचा संदर्भ देत नाफेड आणि एनसीसीएफने प्रत्यक्ष बाजार समितीत जाऊन थेट लिलावात सहभागी होण्यास नकार दिल्याने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. शेतकऱ्यांनी काही काळ लिलाव बंद पाडले. अशा काही घटनांचा अपवाद वगळता बहुतांश बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरळीत पार पडल्याने कांदा कोंडी फुटण्याच्या दिशेने मार्गक्रमण होत असल्याचे चित्र आहे.
लासलगाव बाजार समितीत कांद्याला किमान ६००, कमाल २४५५ तर सरासरी २२०१ रुपये दर मिळाले. केंद्र सरकारने ४० टक्के निर्यात शुल्क लागू केल्यानंतर प्रारंभी व्यापारी आणि नंतर शेतकरी यांच्या भूमिकेमुळे चार दिवस ठप्प झालेले कांदा लिलाव पाचव्या दिवशी काहीअंशी पूर्ववत झाले. नाफेड व एनसीसीएफला समितीतील खरेदीत सहभागी करण्याची मागणी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन्ही संस्थांना बाजार समित्यांच्या आवारात जाऊन थेट कांदा खरेदी करण्याचे तातडीने आदेश काढले.
नाफेडची भूमिका
ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने या खरेदीसाठी शिवार खरेदीचे मार्गदर्शक तत्त्व निश्चित केले आहे. त्याचे उल्लंघन करता येणार नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात थेट खरेदीचे आदेश दिले असले, तरी शेतकरी उत्पादक कंपन्यांना थेट लिलावात सहभागी करता येणार नसल्याची भूमिका नाफेडने मांडली. नाफेडच्या खरेदीचे निकष, केंद्रांची माहिती, कंपन्यांचे प्रतिनिधी बाजार समित्यांमध्ये फलकांद्वारे देतील. या माध्यमातून केंद्रात त्या निकषांची पूर्तता करणारा माल विकता येईल, असे नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रितेश चौहान यांनी सांगितले.
नाफेड व एनसीसीएफ बाजार समितीपासून दूर राहिल्याने देवळा, येवला बाजार समितीत आंदोलन झाले. येवला बाजार समितीत दिवसभर लिलाव बंद होते. लासलगावसह जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरळीत झाल्याचे जिल्हा उपनिबंधक फय्याज मुलाणी यांनी सांगितले. लासलगाव बाजार समितीत दिवसभरात नऊ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यास सरासरी २२०१ रुपये दर मिळाले. तर, मनमाड समितीत सरासरी १९०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. आंदोलनाची धग कमी झाली असली तरी शेतकऱ्यांमधील रोष कायम आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या दरामुळे यापेक्षा कमी दर नको, अशी शेतकऱ्यांची मानसिकता आहे. पण निश्चित झालेला प्रति क्विंटलला २४१० रुपये दर दर्जेदार मालासाठी आहे. या खरेदीत ४५ मिलीमीटर आकारापुढील गुणवत्तापूर्ण कांदा स्वीकारला जातो. प्रतिहेक्टरी २८० क्विंटलचाच निकष आहे. त्यापेक्षा अधिक कांदा खरेदी केला जात नाही. बाजार समितीत शेतकरी सरसकट कांदा आणतात नाफेड, एनसीसीएफ लिलावात सहभागी न होण्याचे हे कारण आहे. नाफेडला जो कांदा हवा आहे, तो निर्यातक्षम दर्जाचा आहे. त्याला किमान पाच हजार रुपये दर देण्याची मागणी कांदा उत्पादक संघटनेने केली आहे.
