कळवण : कळवण तालुक्यातील बेंदीपाडा येथील शेतकरी गुलाब गायकवाड यांची कांद्याने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळच उलटल्याने सर्व कांदा चिखलात आणि पाण्यात पडला. अभोणा उपबाजार समिती येथे भर पावसात आपला चांगल्या प्रतीचा कांदा गायकवाड हे ट्रॅक्टर ट्रॉलीमधून विक्रीसाठी घेऊन येत असताना अभोणा-कनाशी रस्त्यावरील खड्डय़ांमुळे अचानक ट्रॅक्टर ट्रॉली उलटली. भिजलेला कांदा कुणीही घेणार नाही म्हणून चांगला कांदा फेकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

रोज करोडोंची उलाढाल असणाऱ्या समितीत  शेतकऱ्यांसाठी कोणत्याही विशेष सुविधा करण्यात आलेल्या नाहीत. रोज ३०० ते ५०० ट्रॅक्टरची आवक बाजार समितीत होते. शेतमाल खरेदी- विक्रीसाठी येणारे शेतकरी, व्यापारी, शेतमजूर, माथाडी कामगार अशा सर्वाची वर्दळ या उपबाजार आवारात नियमित असते, परंतु, शेतकऱ्यांसाठी येथे ना शुद्ध पिण्याचे पाणी आहे, ना स्वच्छतागृह. लांबून आलेल्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खाली झोपून रात्र काढावी लागते, पावसात तसेच थंडी वाऱ्यापासून संरक्षण करता येईल यासाठी निवारागृहदेखील उपलब्ध नाही, कांदा लिलावासाठी अभोणा-कनाशी रस्त्याच्या कडेला मिळेल त्या ठिकाणी रस्त्यालगत तासन्तास ट्रॅक्टर उभे करून मालविक्रीच्या प्रतीक्षेत शेतकरी बसून असतात, शेतकऱ्यांना किमान आपले ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला सुरक्षितपणे उभे करता येतील यासाठी तरी अभोणा उपबाजार समिती प्रयत्न करेल का, असा प्रश्न अभोणा येथील प्रगतशील शेतकरी देवा ठोके यांनी केला आहे.

दरम्यान, उलटलेला कांद्याचा ट्रॅक्टर उभा करण्यासाठी शेतकऱ्याला ५०० रुपये मोजावे लागले असून कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनीच भिजलेला कांदा परत ट्रॅक्टरमध्ये भरून दिला.