लासलगाव बाजारात प्रति क्विंटल ८५० रुपये भाव
साधारणत: दीड ते दोन महिन्यांपासून सरासरी ७५० रुपये प्रति क्विंटलच्या आसपास रेंगाळणाऱ्या कांद्याच्या भावात मंगळवारी १०० रुपयांनी वाढ होऊन तो ८५० रुपयांवर पोहोचला. ही वाढ अल्प असून त्यातून उत्पादन खर्चही भरून निघणे अवघड असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.
जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याचा महापूर आहे. एकटय़ा नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये दररोज १४ ते १५ हजार मेट्रिक टन कांद्याची आवक होत आहे. गेल्या दीड महिन्यापासून ही स्थिती असल्याने कांद्याचे सरासरी भाव ७५० रुपयांच्या आसपास रेंगाळत आहेत. प्रतवारीनुसार किमान २०० ते कमाल ९०० रुपयांपर्यंत भाव असला तरी सरासरीपेक्षा कमी भाव अधिक्याने मिळतो, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. कांदा भावातील घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने १५ हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यास सुरुवात केली. परंतु, त्या निर्णयाचाही बाजार भावावर काही परिणाम झाला नाही. कारण, खुल्या बाजारातून केंद्र सरकार नाफेडमार्फत ही खरेदी करत असल्याने कांदा व्यापाऱ्याला विकला काय आणि शासनाला विकला काय, नुकसान शेतकऱ्यांचे होत असल्याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले होते. त्यातही केंद्राकडून संपूर्ण देशात केली जाणारी कांदा खरेदी अत्यल्प आहे. हमी भाव जाहीर करून ही खरेदी करणे गरजेचे होते. त्यामुळे भावात सुधारणा झाली असती. परंतु, तसा विचार न झाल्यामुळे कांद्याचे भाव दिवसागणिक गडगडल्याचे पाहावयास मिळाले. सरासरी भावातून उत्पादन खर्च देखील भरून निघत नसल्याने या हंगामात कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. या संकटावर तोडगा काढण्यासाठी चाललेले सरकारी प्रयत्न तोकडे ठरल्याने दुष्काळाच्या खाईत सापडलेला शेतकरी भरडला जात आहे. कांद्याच्या सर्वात मोठय़ा लासलगाव बाजारात सोमवारी कांद्याला सरासरी ७५० रुपये भाव मिळाला. गेल्या कित्येक दिवसांपासून हा भाव कायम आहे. मंगळवारी मात्र त्यात १०० रुपये प्रति क्विंटलने सुधारणा झाली. या दिवशी ५०० टेम्पो, ट्रॅक्टर व जीप कांदा विक्रीसाठी आला होता. त्यास सरासरी ८५० रुपये भाव मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.