लाल कांद्याची आवक वाढली

नाशिक : दिवाळीनंतर उन्हाळ कांद्याची आवक कमी होत असताना दुसरीकडे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये नवीन लाल कांद्याची आवक हळूहळू वाढत आहे. मात्र दरातील चढ-उतार कायम आहे. लासलगाव बाजार समितीत सोमवारी उन्हाळ कांदा ६७८२ तर लाल ४६८ क्विंटलची आवक झाली. उन्हाळला सरासरी २२२५ तर नव्या लाल कांद्याला २३०० रुपये भाव मिळाला.

मे, जूनमध्ये चाळीत साठविलेला कांदा दिवाळीच्या सुमारास संपुष्टात येतो. तोपर्यंत नव्या लाल कांद्याची आवक सुरू होत असल्याने मधल्या काळात काही दिवस मागणी आणि पुरवठय़ात फरक पडतो. पावसामुळे नव्या कांद्याचे आगमन लांबणीवर पडल्याने कांदा दरात चांगलीच वाढ होऊ लागली होती. त्यामुळे केंद्र सरकारने परदेशातून कांदा आयात करण्याची मुभा दिली. त्यानंतर स्थानिक पातळीवर भाव कमी होऊ लागले.

मागील महिन्यात लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याची प्रतिदिन १० ते १२ हजार क्विटंल आवक होती. ही आवक आता निम्म्याने कमी झाली आहे. दुसरीकडे मध्यंतरी २० ते ५० क्विंटल असणारी नव्या लाल कांद्याची आवक आता ५०० प्रतिदिन ५०० क्विटंलवर गेली आहे. हळूहळू आवक वाढत असून पुढील काळात त्यात मोठी वाढ होईल, असे बाजार समितीकडून सांगण्यात आले.

सोमवारी उन्हाळ कांद्याला ८०० ते २५५५, सरासरी २२२५ रुपये तर लाल कांद्याला ८०० ते २७००, सरासरी २३०० रुपये असा भाव मिळाला. दोन दिवसांपूर्वी म्हणजे उन्हाळचा सरासरी भाव १८२५  तर लाल कांद्याला १६६० रुपये दर मिळाले होते. आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी मनमाड  कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ आणि लाल कांद्याची २३० नग इतकी आवक झाली. उन्हाळ कांद्याला सरासरी २१५० रूपये क्विंटल तर लाल कांद्याला १८५० रूपये क्विंटल असा भाव मिळाला.

बाजारपेठेत उन्हाळ, लाल कांद्याची आवक सर्वसाधारण असून बाजार भावात मात्र घसरण झाली आहे. कांद्याची आवक आणि मागणीमुळे दरात सुधारणा दिसून आली. मात्र दिवाळीनंतरच्या बाजारात आवक, बाजार भावात चढउतार होत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहे. उन्हाळी कांद्याचा साठा कमी  झाला असून शेतकरी टप्प्या टप्प्याने बाजारात शेतमाल आणत आहे. त्यामुळे काही प्रमाणात आवकेत चढउतार सुरू आहे. सोमवारी मक्याची २०० नग इतकी आवक होऊन १३८५ ते १६८० सरासरी १५९० रूपये क्विंटल असे भाव होते.