नाशिक: कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळत असल्याने होणाऱ्या नुकसानीकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने मंगळवारपासून पुकारलेल्या बेमुदत कांदा विक्री बंद आंदोलनाला शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेने विरोध केला होता. बाजार बंद करून कोणताही फरक पडणार नाही. उलट या काळात व्यापारी आपला कांदा बाजारात उपलब्ध करून लाभ उठवतील. दक्षिणेकडील नवा कांदा लवकरच बाजारात येत असल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपला माल टप्प्याटप्प्याने विक्री करावा, असे आवाहन केले. या विरोधामुळे कांदा उत्पादक संघटनेला एक पाऊल मागे घेत बेमुदतऐवजी मंगळवारी एका दिवसापुरते आंदोलन करावे लागले. त्यास नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कांद्याच्या सर्वात मोठय़ा लासलगाव बाजार समितीत दैनंदिन आवक १५ हजार क्विंटलने घटली. कांद्याचे अन्य घाऊक बाजार ओस पडल्याचे चित्र होते.

सात-आठ महिन्यांपासून कांद्याला कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे कोटय़वधीचे नुकसान झाल्याचे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे. लिलावात उत्पादन खर्चापेक्षा जास्त म्हणजे २५ रुपये किलोचा दर न मिळाल्यास १६ ऑगस्टपासून कांदा विक्री बंद आंदोलन करण्याचे संघटनेने जाहीर केले होते. कांद्याचे भाव वाढल्यास सरकार निर्यातबंदी करते. परदेशी कांदा आयात करते. कांदा व्यापाऱ्यावर छापे टाकते. साठय़ावर मर्यादा घालते. अशा क्लृप्तय़ा वापरून दर पाडले जातात. मात्र कांदा मातीमोल भावाने विकला जात असताना त्याकडे दुर्लक्ष केले जाते, असे संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी म्हटले होते. या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेने १६ ऑगस्टपासून बेमुदत कांदा विक्री थांबवण्याचे गावोगावी आवाहन केले होते. विक्री बंद झाल्यास देशात कांदाटंचाई निर्माण होऊन सरकारवर दबाव निर्माण होईल. त्यामुळे कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा जास्त दर देण्याचा विचार होईल, अशी कांदा उत्पादक संघटनेची अपेक्षा होती; परंतु त्यास अन्य शेतकरी संघटना आणि या क्षेत्रातील जाणकारांनी विरोध दर्शविला.

शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेने कांदा विक्री बंद करणे म्हणजे शेतकऱ्यांचे नुकसान करण्यासारखे असल्याचे स्पष्ट केले. राज्यासह नाशिक जिल्ह्यातील कोणतीही बाजार समिती बंद राहणार नाही. शेतकऱ्यांनी घाबरून एकाच वेळी कांदा बाजारात आणल्यास भाव कोसळतात. त्यामुळे टप्प्याटप्प्याने मालाची विक्री करावा. समाजमाध्यमातील कांद्याचे घाऊक बाजार बंदच्या संदेशांनी घाबरून जाऊ नये. साठविलेल्या कांद्याचे चाळीत आधीच ४० टक्के नुकसान झाले आहे. बाजार बंद राहिल्यास व्यापारी आपला माल बाजारपेठेत उपलब्ध करतील. त्याचा फायदा व्यापारी घेतील. सध्या मालाची मोठय़ा प्रमाणात आवक होत आहे. कनार्टक व राजस्थानमधील कांदा बाजारात येण्याच्या मार्गावर आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी नुकसान टाळण्यासाठी आपल्याकडील मालाची टप्प्याटप्प्याने विक्री करावी, असे आवाहन शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी केले होते.

शेतकरी संघटनेने विक्री बंद ठेवण्यास विरोध केल्याने उत्पादकांमध्ये संभ्रम पसरला. तो दूर करण्यासाठी अखेर कांदा उत्पादक संघटनेला मूळ भूमिकेत बदल करावा लागला. १६ ऑगस्ट या दिवशी राज्यातील उत्पादकांनी बाजार समितीत आपला कांदा विक्रीसाठी नेऊ नये. हे आंदोलन फक्त एकच दिवस होणार असून १७ ऑगस्टपासून आपापला कांदा विक्रीसाठी घेऊन जावे, असे आवाहन करण्यात आले. त्यास नाशिकसह संपूर्ण राज्यात प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्याने शेतकऱ्यांसाठी कांदा विक्री बंद केली. देशाच्या इतिहासात प्रथमच असे घडल्याचे दिघोळे यांनी सांगितले. लासलगाव बाजार समितीत एरवी २० ते २२ हजार क्विंटलच्या आसपास आवक होते. मंगळवारी हे प्रमाण केवळ तीन हजार क्विंटलवर आले. त्यास सरासरी ११२० रुपये दर मिळाले. अन्य बाजार समित्यांमध्ये उत्पादकांनी कांदा विक्रीसाठी नेला नाही. त्यामुळे कांद्याचे कोटय़वधींचे व्यवहार ठप्प झाले. शेतकरी संघटनेने विरोध करूनही आंदोलनास जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये ही स्थिती होती, असा दावा कांदा उत्पादक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

  गेल्या वर्षीच्या तुलनेत दर ६०० ते ७०० रुपयांनी कमी

लासलगाव बाजार समितीत जून २०२१ मध्ये नऊ लाख २६ हजार क्विंटल कांद्याची आवक होऊन त्यास क्विंटलला सरासरी १८१३ रुपये भाव मिळाला होता. त्यापुढील जुलै २०२१ मध्ये आठ लाख ४४ हजार २३० क्विंटल आवक (सरासरी दर १६९९) आणि ऑगस्टमध्ये २१ मध्ये सहा लाख ९० हजार क्विंटल आवक (सरासरी १६८५ रुपये) मिळाले होते. या वर्षीचा विचार करता जून २०२२ मध्ये आठ लाख २४ हजार क्विंटलची आवक होऊन सरासरी दर १२३० रुपये, जुलैत आठ लाख १४ हजार क्विंटलची आवक होऊन सरासरी दर १२०२ आणि ऑगस्टच्या पंधरवडय़ात आवक टिकून असून दर ११२५ रुपयांवर आले आहेत. दरवर्षी ऑगस्टमध्ये उन्हाळ कांद्याची आवक कमी होऊन दर उंचावतात. यंदा मात्र तसे झालेले नाही. नेहमीपेक्षा दीडपट अधिक उत्पादन झाल्यामुळे ही घसरण झाल्याचे नाफेडचे माजी उपाध्यक्ष चांगदेवकर होळकर यांनी नमूद केले. कांदा विक्री बंद करून हा विषय सुटणार नाही. मागणी-पुरवठा यावर दर निश्चित होतात. उन्हाळ कांद्याची उपलब्धता अधिक असल्याने पुढील एक-दीड महिना दरात सुधारणा होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये नवीन पोळ कांदा बाजारात येतो. तेव्हा साठवलेल्या उन्हाळ कांद्याला कोणी विचारत नाही. हवामानामुळे उन्हाळ कांदा खराब होत आहे. दुहेरी नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला माल टप्प्याटप्प्याने बाजारात न्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला.