अंदाजपत्रकात सभागृह नेत्याचे छायाचित्र विशिष्ट जागेवर समाविष्ट करण्याच्या मागणीमुळे पालिका वर्तुळात वेगवेगळी चर्चा सुरू असताना आता चालू आर्थिक वर्षांचे अंदाजपत्रक रखडल्यावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर शरसंधान साधले आहे.

अंदाजपत्रकाच्या पुस्तिकेत महापौर, उपमहापौरांसमवेत पालिका आयुक्तांचे छायाचित्र असते. त्यांच्या समवेत आपलेही छायाचित्र असावे, अशी मागणी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी केली आहे. सभागृह नेत्यांच्या या मागणीमुळे भाजपसह प्रशासनाचीही अडचण झाली आहे. सभागृह नेत्यांचे छायाचित्र समाविष्ट केल्यास आयुक्तांचे छायाचित्र कुठे समाविष्ट करायचे यावर काथ्याकूट सुरू आहे.  या मुद्यावर काँग्रेसने भाजपवर टीकास्त्र सोडले. महानगरपालिकेमध्ये सत्ता केंद्र नेमके कोणते आहे असा प्रश्न करत महापौर की सभागृह नेता हे सध्या समजत नसल्याचे पश्चिम प्रभाग सभापती डॉ. हेमलता पाटील  यांनी म्हटले आहे. अंदाजपत्रकात कोणाचे छायाचित्र कुठे असावे यावरून कोणी बालहट्ट करून महापालिकेला वेठीस धरणार असेल तर यापेक्षा नाशिककरांचे दुदैव काय, असा प्रश्न, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. नागरिकांनी भाजपला पूर्ण बहुमत देत एकहाती सत्ता दिली. हे बहुमत पदाधिकाऱ्यांमधील कलगीतुरा पाहाण्यासाठी दिले होते का असा संभ्रम नाशिककरांमध्ये निर्माण झाला आहे.

चालू आर्थिक वर्षांचे सर्वसाधारण सभेचे अंदाजपत्रक तीन महिन्यांचा कालावधी जाऊनही पालिका आयुक्तांना प्राप्त झालेले नाही. या स्थितीत त्याची अंमलबजावणी कधी होणार? अंदाजपत्रकात कोणाला किती निधी मिळणार हे माहीत नसताना चार महिन्यांपूर्वी ज्या पक्षात प्रवेश केला, त्या पक्षाच्या नगरसेवकांना पत्र पाठवून आपल्या निधीतील पाच लाखाचा निधी तुम्हाला वर्ग करून देतो, असे सांगणे कितपत कायदेशीर आहे ? महापौर व शहर अध्यक्षांनी अशा लोकांवर अंकुश ठेवायला हवा. सभागृह नेत्यांमुळे जर महापालिकेचे अंदाजपत्रक प्राप्त होत नसेल तर हा नगरसेवकांचा अपमान आहे. सभागृह नेत्यांच्या मनमानी कारभाराची महापौरांनी त्वरित दखल घ्यावी: अन्यथा पुढील सर्वसाधारण सभेत या दिरंगाईबद्दल सभागृहात खुलासा करावा लागेल, असे डॉ. पाटील यांनी म्हटले आहे.