काँग्रेसमधील मतभेद मिटविण्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांचे आवाहन
काँग्रेस पक्ष कात टाकत असून आगामी निवडणुकांना सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याचे दावे पदाधिकाऱ्यांनी केले असले तरी ज्येष्ठ नेत्यांचा वेळ वाचावा यासाठी सोमवारी पदग्रहण सोहळा झाल्यावर नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारी विरोधात निश्चित केलेला मोर्चा ऐनवेळी रद्द करण्याची नामुष्की या पक्षावर ओढवली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यालयात पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा थाटामाटात पार पडला. या वेळी पक्षांतर्गत मतभेद व गटबाजीचे दर्शन झाले. या सोहळ्यास फारशी गर्दी नसल्याने पदाधिकाऱ्यांनी वेगळेच कारण देऊन मोर्चा रद्द करत असल्याचे जाहीर केले.
शहर काँग्रेसच्या वतीने वाढत्या गुन्हेगारीसह विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी विरोधी पक्ष नेत्यांच्या उपस्थितीत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता. सकाळी विखे पाटील यांनी पिंपळगाव-बसवंत येथे कांदा प्रश्नावर रास्ता रोको आंदोलन केले. तासभर हे आंदोलन सुरू होते. त्यानंतर विखे पाटील यांचा वाहन ताफा शहरातील काँग्रेस कमिटी कार्यालयात दाखल झाला. काँग्रेस पदाधिकारी आपली वाहने घेऊन दाखल झाल्यामुळे महात्मा गांधी रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था पुरती कोलमडून पडली. विखे पाटील यांच्या उपस्थितीत नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा आणि नंतर मोर्चा असे नियोजन होते. कांदाप्रश्नी आधीच झालेल्या आंदोलनामुळे ज्येष्ठ नेत्यांच्या वेळेची बचत व्हावी म्हणून हा मोर्चा रद्द करण्यात आल्याचे शहराध्यक्ष शरद आहेर यांनी प्रास्ताविकात सांगितले.
वास्तविक कार्यकारिणी पदग्रहण सोहळ्यात शहर कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांनी बराच वेळ खर्ची पाडला. या सोहळ्यास जेमतेम गर्दी असल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मोर्चाचा अट्टहास धरला नसावा, अशी चर्चा आहे. पदग्रहण सोहळ्यास ६५ नूतन पदाधिकाऱ्यांपैकी एका गटासाठी प्रत्येकी पाच जणांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. या वेळी विखे पाटील यांनी मार्गदर्शन केले. याआधी आंदोलन करताना कार्यकर्त्यांसाठी गाडय़ा पाठवाव्या लागत होत्या. आता लोक स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहे. सरकारविषयी असंतोष खदखदत असल्याने आंदोलनात स्वयंस्फूर्तीने नागरिकांचा सहभाग वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
केंद्र तसेच राज्य सरकारवर ताशेरे ओढताना विखे-पाटील यांनी मित्रपक्ष शिवसेनेची स्थिती सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी असल्याचा टोला लगावला. स्वाभिमान गहाण टाकल्यासारखी सेनेची अवस्था झाली आहे. भाजपने आपल्या कारभारातून आगामी निवडणुकांसाठी अनेक मुद्दे दिले आहेत. ज्यावरून त्यांना कोंडीत पकडता येऊ शकते. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये पक्षांची अधोगती रोखायची असेल तर कार्यकर्त्यांनी गटबाजी, अंतर्गत वाद मिटवून पक्षात सक्रिय होणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ज्येष्ठ-पक्षनिष्ठ लोकांना संधी देताना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसेल तर नव्या चेहऱ्यांना संधी द्यायला हरकत नाही. मात्र बाहेरून येणाऱ्या काही लोकांमुळे पक्षाची प्रतिमा खराब होत नाही ना याची काळजी घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला. उमेदवारी म्हणजे पक्षाचा पाठिंबा असे नाही, असे सूचक विधानही त्यांनी केले. आगामी निवडणुका लक्षात घेऊन कार्यकर्ते आणि उमेदवारांसाठी आचारसंहिता तयार करण्यात येणार आहे. आ. निर्मला गावित यांनी भाजप सरकारने कामे केली नसल्याचे सांगितले. लोकांच्या मनात भाजपला निवडून दिल्याची सल आहे. आपल्याकडे अनेक मुद्दे आहेत. आगामी निवडणुकांमध्ये ते कौशल्यपूर्णक मांडणे गरजेचे आहे. पक्षात काम करताना अंतर्गत मतभेद बाजूला ठेवणे गरजेचे असल्याचे सांगून गटबाजीवर बोट ठेवले. या वेळी वत्सला खैरे, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे पाटील आदी उपस्थित होते.