scorecardresearch

नाशिक: पांजरापोळ जागेवरील औद्योगिक आरक्षणास विरोध तीव्र, पर्यावरणप्रेमीही मैदानात

औद्योगिक आरक्षणास जिल्ह्यातील विविध पर्यावरणीय संस्थांनी विरोध केला असून यासंदर्भात जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांना निवेदन दिले आहे.

Opposition to industrial reservation
औद्योगिक आरक्षणास जिल्ह्यातील विविध पर्यावरणीय संस्थांचा विरोध (फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: शहराचा प्राणवायू कारखाना (ऑक्सिजन फॅक्टरी) म्हणून ओळख असलेल्या चुंचाळे शिवारातील पांजरापोळच्या नैसर्गिक जैवविविधता असलेल्या ८२५ जागेवर औद्योगिक आरक्षणास जिल्ह्यातील विविध पर्यावरणीय संस्थांनी विरोध केला असून यासंदर्भात जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांना निवेदन दिले आहे.

पांजरापोळ जागेवरील औद्योगिक आरक्षणावरुन सध्या शहरात वाद सुरु आहेत. या जागेचे पर्यावरणीयदृष्ट्या नाशिकसाठी असलेले महत्व लक्षात घेऊन आता पर्यावरणविषयक काम पाहणाऱ्या संस्थाही आरक्षणाविरोधात पुढे आल्या आहेत. पांजरापोळ जागेवरील जंगल हे जैविक विविधतेचे ठिकाण आहे. ते वाचविण्यासाठी अखेरपर्यंत लढा उभारण्याचा निर्धार या संस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे. औद्योगिक आरक्षणास अन्य पर्याय शोधावा, औद्योगिक कामासाठी नैसर्गिक संपदा नष्ट करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

शहरापासून जवळच असलेल्या चुंचाळे शिवारातील पांजरापोळची जागा हे नैसर्गिकदृष्ट्या महत्वाचे ठिकाण आहे. याठिकाणी भारतीय प्रजातीची असंख्य झाडे आहेत. वन्यजीव प्राणी, पक्षी, नैसर्गिक तळे, कुंड, सेंद्रिय शेती, पाळीव जनावरे अशी खूपच मोठी पर्यावरणीय संसाधने आहेत. एकिकडे नाशिकची ओळख थंड हवेचे ठिकाण अशी आहे. त्याला कुठेही बाधा नको, तसेच हे नैसर्गिक संतुलन टिकविणे अवश्यक आहे. उद्योग व्यवसाय हा कोरडवाहू क्षेत्र किंवा औद्योगिक क्षेत्रातील राखीव क्षेत्र येथे उद्योग आणावेत म्हणजे रोजगार वाढेल. परंतु, यासाठी बहरलेली नैसर्गिक संपदा नष्ट करू नये, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी ज्येष्ठ पशुपक्षी मित्र भारती जाधव, शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे राम खुर्दळ यांसह इतर उपस्थित होते.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 17:25 IST

संबंधित बातम्या