लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: जिल्ह्यातील सिन्नर, उमराणे, येवल्यासह काही बाजार समित्यांमध्ये कांद्याची विक्री करून दोन वर्षांचा कालावधी लोटूनही शेतमाल खरेदीचे अधिकृत परवाने असलेल्या व्यापाऱ्यांकडे कोट्यवधी रुपये बाकी आहेत. वारंवार चकरा मारूनही हे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. शेतमाल विक्री केल्यानंतर २४ तासाच्या आत शेतकऱ्यांची पूर्ण रक्कम देण्याचा शासन नियम असूनही काही वर्षांपासून जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांचे कांदा विक्रीचे पैसे बाजार समित्यांमध्ये अडकले असून जोपर्यंत ही थकीत रक्कम दिली जात नाही, तोपर्यंत बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित करावी, अशी मागणी राज्य कांदा उत्पादक संघटनेने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेकडे केली आहे.
या संदर्भातील निवेदन संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे, ज्ञानदेव सानप, तानाजी मापारी आदींनी जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना दिले. जिल्ह्यातील बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे. कृषिमाल विक्री करून दोन, दोन वर्षांचा कालावधी लोटूनही अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा विक्रीचे पैसे बाजार समितीचे अधिकृत परवाने असलेल्या व्यापाऱ्यांकडे बाकी आहेत. त्यामुळे सर्व बाजार समित्यांमध्ये किती रक्कम थकीत आहे, याची सहकार विभागाने तात्काळ माहिती मागून घ्यावी.
आणखी वाचा- जळगाव: चाळीसगावमध्ये व्यापाऱ्याकडून मापात घोळ; आमदारांकडूनच प्रकार उघड
संबंधित बाजार समित्यांकडून शेतकऱ्यांची संपूर्ण रक्कम थकीत रक्कम अदा करावी. त्यानंतरच निवडणुकीचा कार्यक्रम राबवावा. शेतकऱ्यांचे थकीत पैसे दिले जात नाही, तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया न थांबविल्यास संघटनेच्या नेतृत्वाखाली बाजार समिती संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया रोखली जाईल, असा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.