सर्पमित्रांची तैनाती अन् बिबटय़ासाठी पिंजराही ; नाशिकमध्ये साहित्य संमेलनस्थळी खबरदारीचे उपाय

आधीचे संमेलनस्थळ शहराच्या मध्यवर्ती भागात होते. नवीन स्थळ ग्रामीण भागास लागून आहे.

अनिकेत साठे, लोकसत्ता

नाशिक : सभोवताली बहरलेली शेती आणि हिरवाईने नटलेला एमईटी भुजबळ नॉलेज सिटीचा विस्तीर्ण परिसर अशा निसर्गरम्य वातावरणात होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात खबरदारीसाठी प्रथमच काही वेगळे उपाय योजले जाणार आहेत. परिसरात कधी कधी साप दृष्टीस पडतात. त्यांना पकडण्यासाठी संमेलन काळात सर्पमित्र तैनात राहतील. मागील काही वर्षांत शहरासह आसपासच्या भागात बिबटय़ाचा संचार वाढला आहे. त्यामुळे परिसरात िपजरा आणि वन विभागाचे पथकही ठेवण्याची तयारी सुरू आहे.

आधीचे संमेलनस्थळ शहराच्या मध्यवर्ती भागात होते. नवीन स्थळ ग्रामीण भागास लागून आहे. स्थळ बदलाने नियोजनात काही फेरबदल करावे लागत आहेत. तीनदिवसीय संमेलनात संभाव्य आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी आपत्कालीन नियोजन समितीवर आहे. संमेलनस्थळी भेट दिल्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनी सापांच्या संभाव्य धोक्याकडे लक्ष वेधले होते. भुजबळ नॉलेज सिटीच्या व्यवस्थापनास ही बाब आधीपासून ज्ञात आहे. त्याचा संदर्भ घेऊन संमेलनाचे मुख्य समन्वयक विश्वास ठाकूर यांनी शैक्षणिक संस्थेतील काही कर्मचारीच सर्पमित्र असल्याचा दाखला दिला होता. आपत्ती व्यवस्थापनात आणखी काही सर्पमित्रांचा समावेश करण्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

सर्पमित्रांबरोबर वन विभागाचीही मदत घेतली जाणार आहे. बिबटय़ाला पकडण्यासाठी वापरला जाणारा िपजरा आणि बचाव वाहन परिसरात ठेवण्याविषयी विचारविनिमय झाल्याचे आपत्कालीन नियोजन समितीचे प्रमुख योगेंद्र पाटील यांनी सांगितले. याबाबत वन विभागाला पत्र देण्यात येणार आहे. दोन ते सहा डिसेंबरदरम्यान संमेलनस्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित राहील. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि नागरी संरक्षण दलाकडे प्रशिक्षित स्वयंसेवक असतात.

आपत्ती व्यवस्थापनात त्यांच्यासह अग्निशमन दलाच्या जवानांनाही समाविष्ट केले जाणार आहे. वन विभागाकडे पिंजरा आणि बचाव वाहनासह पथक तैनात करण्याची विनंती केली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

आजवरच्या मराठी साहित्य संमेलनात खास सर्पमित्र तैनात ठेवणे आणि बिबटय़ाच्या सावटामुळे पिंजरा लावण्याची वेळ बहुधा कुठे आलेली नसेल. पण, नाशिकच्या संमेलनात खबरदारीच्या दृष्टिकोनातून त्याची व्यवस्था केली जाणार आहे. मागील काही वर्षांत बिबटय़ाने थेट शहरात शिरकाव केल्याच्या घटना घडल्या आहेत. ग्रामीणमधील काही भाग बिबटय़ाच्या सावटाखाली असतो. याआधी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पिंपळगाव येथील जाहीर सभेत सर्पमित्रांची फौज तैनात करण्यात आली होती. ६०० एकरच्या विस्तीर्ण गवताळ मैदानावर सापांच्या धास्तीने ती करावी लागली. साहित्य संमेलनात त्याची पुनरावृत्ती होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Organizer taking precautions at sahitya sammelan place in nashik zws

ताज्या बातम्या