आर्थिक विकासासाठी भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केलेले असून, या परिस्थितीत प्राप्त होणाऱ्या नवनवीन संधींचा पदवीधरांनी फायदा घेऊन आत्मनिर्भर भारताचे ध्येय साकार करण्यात योगदान द्यावे, असे आवाहन केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. एस. चंद्रशेखर यांनी केले.
हेही वाचा- नाशिकमध्ये शनिवारपासून देहदान, अवयवदानविषयक राज्यस्तरीय अधिवेशन




कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा शुक्रवारी ३१ वा दीक्षांत समारंभ झाला. या सोहळ्यात डॉ. चंद्रशेखर यांनी मार्गदर्शन केले. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी होते. मंचावर प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेंद्र नन्नवरे, प्रा. संदीप पाटील, सहसंचालक संतोष चव्हाण, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल, अधिष्ठाता डॉ. अनिल डोंगरे, वित्त व लेखा अधिकारी रवींद्र पाटील उपस्थित होते.
हेही वाचा- “धरणगावसह जळगाव जिल्ह्यात पाच शहरांमध्ये एमआयडीसी”; मुख्यमंत्र्यांची घोषणा
डॉ. चंद्रशेखर यांनी स्मार्ट तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग यांचा मोठा बोलबाला असून, अशा परिस्थितीत आपल्याला मार्गदर्शकांसाठी नवीन नियम पुस्तिका करावी लागणार असल्याचे सांगितले. भारतात दरवर्षी २५ हजारांपेक्षा अधिक डॉक्टरेट तयार होत असले तरी संशोधनाचा दर्जा चिंतेचा विषय असल्याचे त्यांनी सांगितले. कुलगुरू प्रा. इंगळे यांनी विद्यापीठाचा विकास आढावा सादर करीत भविष्यकालीन योजनांचाही संकल्प बोलून दाखविला. कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी स्नातकांना उपदेश केला. कार्यक्रमात कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांच्या हस्ते सुवर्णपदके वितरित करण्यात आली.