नाशिक : अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धाची झळ आखाती देशांनाही बसली असून दुबईत पुणे, अहिल्यानगर, जळगाव, धुळ्यासह महाराष्ट्रातील विविध भागांतील अंदाजे ३५० हून अधिक पर्यटक अडकले आहेत. पर्यटकांचे हे गट तिथे वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये सुरक्षित आहेत. त्यांना तिथे भेडसावणाऱ्या अडचणी सोडविल्या जात आहेत. दोन-तीन दिवसांत परिस्थिती थोडीफार निवळल्यास विशेष विमान सेवा सुरू होईल, तेव्हा या पर्यटकांना माघारी आणले जाईल, असे राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
युद्धजन्य परिस्थितीत आखाती देशांसह इतर प्रभावित देशांमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी शासनाने अत्यावश्यक सूचना केल्या होत्या. परराष्ट्र मंत्रालयाने विविध भारतीय दूतावासांचे आपत्कालीन मदतवाहिनी क्रमांक जाहीर केले आहेत. परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांनी अनावश्यक हालचाल टाळावी, दूतावासांच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि दूतावासांकडे नोंदणी करावी, असे आवाहन आधीच केलेले आहे. दुबई येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची संख्या मोठी असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक दौऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. दुबईहून सातत्याने फोन येत आहेत. अहिल्यानगर, पुणे, धुळे व जळगाव अशा वेगवेगळ्या भागांतील नागरिकांचे गट युद्ध सुरू झाल्यामुळे विमानसेवा बंद झाली आणि तिथे अडकून पडले.
या गटांमधील नागरिकांची संख्या ३०० ते ३५० असू शकते. मंगळवारी सकाळपासून तिथे अडकलेल्या १५ ते २० गटांशी बोलणे झाले आहे. तिथे ते हॉटेलमध्ये असून सुरक्षित आहेत. पर्यटनासाठी हॉटेलमध्ये केलेली नोंदणी संपुष्टात आली आहे. काहींचे पैसे संपलेले आहेत. संबंधितांनी काळजी करू नये, आवश्यक ती संपूर्ण व्यवस्था केली जाईल असे सांगण्यात आल्याचे महाजन यांनी नमूद केले. दोन-तीन दिवसांत परिस्थिती थोडीफार निवळेल, विशेष विमानसेवा सुरू होईल. केंद्र सरकारकडून तिथे संपर्क सुरू आहे. दूतावासांशी संपर्क साधण्यात आला आहे. लवकरच अडकलेल्या या पर्यटकांना परत आणले जाईल, असे त्यांनी सांगितले.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांविषयी केलेल्या विधानावर मंत्री महाजन यांनी टीकास्त्र सोडले. राऊत यांना स्वातंत्र्य असल्याने ते काहीही बोलू शकतात. त्यांना काही मर्यादा नाही. जग तिसऱ्या महायुद्धाकडे चालले असताना तारतम्य बाळगायला हवे. परंतु, राऊत हे प्रत्येक गोष्टीत राजकारण करतात, बालिश विधाने करतात अशी टीका त्यांनी केली.
कांदा उत्पादकांची मागणी रास्त
युद्धामुळे मुंबईतील न्हावाशेवा अर्थात जवाहरलाल नेहरू बंदरावर कांदा, द्राक्ष व केळीचे १५० ते २०० कंटेनर अडकून पडले आहेत. दुबईत हल्ले होत आहेत. परिस्थिती गंभीर आहे. आता परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, त्याला सामोरे जावे लागेल. कांद्याला अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी रास्त आहे. मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर विचार होऊन शासन योग्य निर्णय घेईल, असे मंत्री गिरीश महाजन यांनी नमूद केले.
