प्राणवायूच्या टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा

नाशिक : करोनाच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायूचा प्रचंड तुटवडा भासत आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आता हवेतून प्राणवायुनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पांची संकल्पना मांडण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयात कायमस्वरूपी प्राणवायूची व्यवस्था व्हावी, यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात जिल्हा शासकीय आणि प्रत्येकी चार उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयात सुमारे ११ कोटी रुपयांच्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढत्या रुग्णांमुळे रुग्णालयांसह खाटांचा विस्तार करूनही सुविधा कमी पडत आहेत. अनेकांना कृत्रिम श्वसन यंत्रणा आणि प्राणवायूचा आधार लागत आहे. याची परिणती प्राणवायूची गरज वाढण्यात होऊन त्याचा तुटवडा जाणवत आहे.  काही रुग्णालयांत तशा खाटा असल्या तरी प्राणवायू मिळत नसल्याने ते रुग्णांना स्वीकारत नाही. द्रवरूप प्राणवायूची टंचाई सर्वत्र जाणवत आहे.

या संकटातून मार्ग काढण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयात कायमस्वरूपी प्राणवायूची व्यवस्था करण्यासाठी नैसर्गिक पद्धतीने प्राणवायुनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाची संकल्पना मांडली. करोनाकाळात प्राणवायूयुक्त खाटांची संख्या वाढविली गेली. मात्र, द्रवरूप प्राणवायूचा पुरवठा होत नसल्याने प्राणवायूचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्हा सामान्य रुग्णालयासह जिल्ह्यातील चार उपजिल्हा रुग्णालय आणि चार ग्रामीण रुग्णालयांत कायमस्वरूपी प्राणवायुनिर्मिती प्रकल्पांची उभारणी करण्याचे आदेश छगन भुजबळ

यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात १० रुग्णालयांत प्राणवायुनिर्मिती प्रकल्पांच्या उभारणीसाठी १० कोटी ८८ लाख रुपयांच्या या प्रकल्पांस प्रशासकीय मान्यता दिली आहे.

या प्रकल्पामुळे द्रवरूप प्राणवायूची गरज भासणार नाही.

नैसर्गिक स्वरूपात हवेतील प्राणवायू यातून मिळणार आहे. त्यामुळे वाहतुकीचा येणारा खर्च कमी होणार असून कायमस्वरूपी प्राणवायूची व्यवस्था होणार आहे. या प्रकल्पाच्या देखभाल आणि दुरुस्ती खर्चात मोठी बचत होईल. करोनाकाळात रुग्णांना प्राणवायूचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिल्यानंतर आता प्रकल्पाची पुढील प्रक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या स्तरावर तातडीने राबविली जाणार आहे.

८६० मोठय़ा सिलेंडरची पूर्तता

पहिल्या टप्प्यात जिल्हा रुग्णालयासह मनमाड, येवला, कळवण आणि चांदवड या उपजिल्हा रुग्णालयात तसेच सिन्नर, पिंपळगाव बसवंत, इगतपुरी आणि वणी या ग्रामीण रुग्णालयात प्राणवायुनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. महिनाभरात हे प्रकल्प कार्यान्वित होतील. या प्रकल्पांच्या माध्यमातून प्रतिदिन नैसर्गिक स्वरूपात ८६० मोठे सिलेंडर भरतील इतक्या प्राणवायूची निर्मिती होईल. संबंधित रुग्णालयात कायमस्वरूपी व्यवस्था होणार आहे.