जळगाव : घरात चिमुकल्याच्या पहिल्या वाढदिवसाचा आनंद… नातेवाईकांची लगबग, शुभेच्छांचा वर्षाव आणि घरभर उत्साहाचे वातावरण. मात्र, या आनंदाला अवघ्या एका दिवसात काळ्या दुःखाची किनार लाभली. पाचोरा शहरातील कृष्णापुरी भागातील सारोळा रोड परिसरात झोळीत झोपलेल्या एक वर्षीय संघर्ष पाटील या बालकाचा गळफास लागून दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारीच संघर्षचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी घडलेल्या या घटनेने पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सैनिक राहुल बापुराव पाटील (बागले) यांचा मुलगा संघर्ष याचा रविवारी पहिला वाढदिवस होता. त्यामुळे पाटील कुटुंबीयांसाठी हा दिवस विशेष होता. चिमुकल्याच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त कुटुंबीय आणि नातेवाईकांनी आनंद साजरा केला. वर्षभरापूर्वी घरात आलेल्या या चिमुकल्याचा पहिला वाढदिवस उत्साहात साजरा झाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मात्र, कोणालाही कल्पना नव्हती की या आनंदाच्या क्षणानंतर अवघ्या एका दिवसात कुटुंबावर एवढे मोठे संकट कोसळणार आहे. वाढदिवसाच्या आठवणी ताज्या असतानाच संघर्षच्या मृत्यूची बातमी कुटुंबीयांवर वज्राघातासारखी कोसळली.

नेहमीप्रमाणे झोक्यात झोपवले…

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी दुपारच्या सुमारास संघर्षला नेहमीप्रमाणे घरातील झोळीत झोपवण्यात आले होते. तो झोपेतून खाली घरंगळत पडू नये, यासाठी त्याच्या पोटाला रुमालाने बांधण्यात आले होते. बालक झोपेत असताना त्याची सुरक्षितता राहावी, या उद्देशाने कुटुंबीयांनी ही व्यवस्था केली होती. मात्र, झोळीत झोपलेल्या संघर्षची हालचाल झाली आणि तो झोक्याच्या पायथ्याकडे सरकला. त्यावेळी त्याच्या पोटाला बांधलेला रुमाल वर सरकत गळ्याजवळ आला. त्यातून त्याला गळफास बसल्याची दुर्दैवी घटना घडली. काही वेळाने संघर्षची आई झोक्याकडे पाहण्यासाठी गेली असता मुलाच्या गळ्याला रुमालाचा फास बसल्याचे तिच्या निदर्शनास आले. हे दृश्य पाहून आईने आरडाओरड केली. त्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ संघर्षला झोक्यातून बाहेर काढले आणि उपचारासाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेले.

नातेवाईकांचा रुग्णालयात आक्रोश

संघर्षला वाचविण्यासाठी कुटुंबीयांनी तातडीने प्रयत्न केले. त्याला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर संघर्षला मृत घोषित केले. डॉक्टरांनी मृत घोषित करताच आईसह कुटुंबीय आणि नातेवाईकांनी रुग्णालयात एकच हंबरडा फोडला. ज्या चिमुकल्याच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त रविवारी घरात आनंद साजरा करण्यात आला होता, त्याच चिमुकल्याचा दुसऱ्याच दिवशी मृत्यू झाल्याने कुटुंबीयांच्या दुःखाला पारावार उरला नाही. संघर्षच्या आठवणींनी कुटुंबीयांचा आक्रोश सुरू होता. या घटनेने रुग्णालय परिसरातही हळहळ व्यक्त करण्यात आली. लहान मुलाचा पहिला वाढदिवस हा प्रत्येक पालक आणि कुटुंबासाठी अविस्मरणीय असतो. संघर्षच्या कुटुंबीयांनीही रविवारी त्याचा पहिला वाढदिवस आनंदात साजरा केला. मात्र, दुसऱ्याच दिवशी घडलेल्या या घटनेमुळे तो आनंदाचा दिवस आता कुटुंबीयांच्या आयुष्यातील सर्वांत वेदनादायी आठवण ठरला आहे. पाटील कुटुंब आक्रोशात बुडाले आहे. संघर्षच्या अकाली आणि दुर्दैवी मृत्यूने पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.