जळगाव : पश्चिम रेल्वेच्या जळगाव–उधना रेल्वे मार्गावरील पाळधी रेल्वे स्थानकाला महाव्यवस्थापक रामाश्रय पांडे आणि विभागीय व्यवस्थापक पंकज सिंह यांनी नुकतीच धावती भेट दिली. या भेटीदरम्यान स्थानिक नागरिकांच्या रेल्वे संबंधित विविध मागण्या, प्रवासी सुविधा आणि स्थानकावरील आवश्यक सुधारणा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान, पाळधी स्थानकावर सुरत, मुंबईकडे धावणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी केली.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप गुलाबराव पाटील यांनी अधिकाऱ्यांचे पाळधी रेल्वे स्थानकावरील महत्त्वाच्या समस्यांकडेही लक्ष वेधले. विशेषतः सुरत–अमरावती, सुरत–भुसावळ तसेच खान्देश एक्स्प्रेस या महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना पाळधी येथे अधिकृत थांबा देण्याची जोरदार मागणी त्यांनी केली. या गाड्यांना पाळधीत किमान दोन मिनिटांचा थांबा मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रताप पाटील यांनी आपल्या निवेदनात नमूद केले की, पाळधी हे जळगाव जिल्ह्यातील जवळपास ५० गावांशी कनेक्टिव्हिटी असलेले महत्त्वाचे रेल्वे स्थानक असून, परिसरातील नागरिक या स्थानकावरून प्रवास करतात. शिक्षणासाठी बाहेरगावी जाणारे विद्यार्थी, व्यापारासाठी सतत प्रवास करणारे व्यापारी, शेतीमाल विक्रीसाठी विविध शहरांमध्ये जाणारे शेतकरी तसेच नोकरीनिमित्त दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
मात्र, लांबपल्ल्याच्या काही रेल्वे गाड्यांना येथे थांबा नसल्याने नागरिकांना जळगाव किंवा धरणगाव येथे जाऊन रेल्वे पकडावी लागते. त्यामुळे प्रवाशांना वेळ, पैसा आणि श्रम यांचा अतिरिक्त भार सहन करावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाळधी परिसरातील नागरिकांची दीर्घकालीन मागणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने या प्रश्नाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. विशेषतः सुरत–अमरावती, सुरत–भुसावळ तसेच खान्देश एक्स्प्रेस या गाड्यांमुळे व्यापारी वर्गाला मोठी सुविधा मिळेल. तिन्ही गाड्यांना थांबा मिळाल्यास विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील यांनी सांगितले.
या वेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी स्थानक परिसराची पाहणी करत प्रवाशांच्या अडचणी जाणून घेतल्या. स्थानिक नागरिकांनीही विविध समस्या आणि मागण्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक त्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करण्यात येईल, अशी ग्वाही संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या प्रसंगी पाळधीचे माजी सरपंच अरुण पाटील, प्रशांत झवर, धनराज कासट, अनिल माळी, दिलीप माळी, राकेश धनगर, योगेश माळी तसेच जीपीएस ग्रूपचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रेल्वे अधिकाऱ्यांच्या भेटीमुळे पाळधी रेल्वे स्थानकाच्या विकासाबाबत तसेच सुरत–अमरावती, सुरत–भुसावळ आणि खान्देश एक्स्प्रेस यासारख्या महत्त्वाच्या गाड्यांच्या थांब्याबाबत नागरिकांमध्ये आशावादी वातावरण निर्माण झाले आहे.
