नंदुरबार : तुम्ही मला राजकीय व्यासपीठावर भाषणासाठी बोलवाच, मग काय राजकीय भाषण देते ते पहा, असा मिश्कील टोला राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी हाणला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील ओंकार शुगरच्या गळीत हंगामाचा मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले.
शहादा परिसराचा भाग्यविधाता म्हणून ओळख असलेल्या सातपुडा सहकारी साखर कारखान्याची अवस्था काही वर्षांपासून नाजूक आहे. अशातच दोन हंगामात गळीतच होऊ न शकलेल्या या कारखान्याला ओंकार शुगर अँन्ड अलाईड इंडस्ट्रीज प्रा. लि. ने चालविण्यासाठी घेतला आहे. गेल्यावर्षी गाळपाचे काही प्रमाणात प्रात्यक्षिक देखील घेण्यात आले. मात्र यंदा कारखान्यात पूर्ण क्षमतेने गाळप हंगाम करण्याचा निर्धार करत मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत ओंकार शुगरने बॉयलर अग्निप्रदीपन आणि मोळी पूजनाचा कार्यक्रम केला.
पंकजा मुंडे या कार्यक्रमासाठी खास हेलीकॉप्टरने शहाद्यात दाखल झाल्याने नेंमका पंकजा मुंडे आणि ओंकार शुंगर यांचा संबंध काय, असा प्रश्नच उपस्थित झाला. याबाबत मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणातून उत्तर दिले. राज्यात मोठी राजकीय धामधूम असतांना मी एवढ्या लांब का आली, असा सर्वांना प्रश्न पडला असेल. आमचा वैद्यनाथ कारखाना देखील ओंकार शुगरच्या बोत्रेपाटलांनी तीन वर्षांपासून चालवायला घेतला असल्याने मी त्यांच्या शब्दासाठी इथे आल्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
मजुरी करणारे आमचे ऊसतोड कामगार कारखान्याचे मालक बनले पाहिजे, याच धोरणातून अटलबिहारी वाजपयी यांच्या सरकारच्या कार्यकाळात गोपीनाथ मुंडे यांनी एका वर्षात २२ कारखाने उभारले होते. काही काळ हे कारखाने चालल्यानंतर काही अडचणींमध्ये राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना सरकाराने विविध पॅकेजच्या माध्यमातून धीर दिला. कारखान्यावर १० हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने हे कुटूंब देशोधडीला लागू नये म्हणून सरकाराने वळोवेळी मदत केली असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.
शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम ओंकार शुगरचे बापूराव बात्रेपाटील करत आहेत. कुठलेही राजकीय पाठबळ नसलेला या माणसाचा मोठा उद्योगपती पर्यतचा प्रवासही खडतर आहे. गेल्या काळात त्यांनी मराठवाड्यात उसाला सर्वाधिक भाव दिला. त्याप्रमाणे यंदाही ते उत्तर महाराष्ट्रात उसाला सर्वाधीक भाव देतील, अशी अपेक्षापंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. आमच्या सारख्या राजकारण्यांनी साखर कारखान्यात कितीही चांगले काम केले. तर त्याला काही तरी विरोध होवून कारखानाच अडचणीत येतो, असेही पंकजा मुडे म्हणाल्या.
