नाशिक : माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवारी महापालिकेच्या ‘सिटीलिंक’ बसमधून प्रवास करीत भाजपच्या प्रचाराची दिशा अधोरेखीत केली. सातपूर परिसरात पाच ते सात मिनिटे त्यांनी बसमधून प्रवास केला. आगामी महापालिका निवडणुकीत ही बस सेवा प्रचाराच्या केंद्रस्थानी राहणार असून बस प्रवासातून तोच उद्देश साधला गेल्याची चर्चा पक्षाच्या वर्तुळात होत आहे.

भाजपच्या चिटणीस व माजी मंत्री मुंडे या दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. दुसऱ्या दिवशी त्यांच्या उपस्थितीत ‘वसंत स्मृती’ कार्यालयात कार्यकर्ता संवाद कार्यक्रम झाला. तत्पुर्वी सकाळी सातपूर येथे एका गृह प्रकल्पाचे लोकार्पण मुंडे यांच्या हस्ते झाले. हा कार्यक्रम झाल्यानंतर सातपूर परिसरात खु्द्द मुंडे व भाजपच्या आमदार सीमा हिरे, महापौर सतीश कुलकर्णी व अन्य पदाधिकाऱ्यांनी ‘सिटीिलक’ बसने प्रवास केला. चार महिन्यांपूर्वी महापालिकेने ही बससेवा सुरू केली आहे. केंद्र सरकारच्यावतीने नुकताच तिचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव झाला. याची माहिती समजल्यानंतर या बसमधून प्रवासाची इच्छा मुंडे यांनी व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांनी बसची व्यवस्था करून सातपूर भागात भ्रमंती करण्यात आली. दरम्यान, कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मुंडे यांनी आगामी महापालिका निवडणूक पूर्ण शक्तीनिशी लढणार असल्याचे सांगितले. आपला संवाद व संस्कार ही मोठी ताकद आहे. करोना काळात भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर होते. आपण मोठे काम केले. देशात १०० कोटी लसीकरण झाल्याचा आनंद असल्याचेही त्या म्हणाल्या.