जळगाव : मध्य रेल्वेच्या मुंबई–भुसावळ मार्गावर वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता स्वतंत्र गाडी सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. दरम्यान, मुंबईहून जळगाव, भुसावळ मार्गे नवीन एक्स्प्रेस २३ फेब्रुवारीपासून नियमितपणे धावणार आहे. या गाडीला तब्बल ११ जनरल (सामान्य द्वितीय श्रेणी) डबे जोडले जाणार असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना गर्दीच्या हंगामात मोठा दिलासा मिळू शकणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर मध्य रेल्वेच्या पनवेल ते अलीपूरद्वार स्थानकांदरम्यान अमृत भारत साप्ताहिक एक्स्प्रेसची नियमित सेवा २३ तारखेपासून नियमितपणे सुरू होत आहे. गाडी क्रमांक ११०३१ पनवेल–अलीपूरद्वार अमृत भारत एक्स्प्रेस २३ फेब्रुवारीपासून दर सोमवारी पनवेल रेल्वे स्थानकावरुन सकाळी ११.५० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी दुपारी ०१.५० वाजता अलीपूरद्वार जंक्शन स्थानकावर पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ११०३२ ही २६ फेब्रुवारीपासून दर गुरुवारी पहाटे ४.४५ वाजता अलीपूरद्वार येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ५.३० वाजता पनवेल येथे पोहोचेल.

ही साप्ताहिक एक्स्प्रेस दोन्ही बाजुने कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना, मानिकपूर, बरगढ, प्रयागराज छिवकी, मेजा रोड, मिर्झापूर, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, सोनपूर, हाजीपूर, मुजफ्फरपूर, समस्तीपूर, हसनपूर रोड, खगडिया, मानसी, नौगछिया, कटिहार, बरसोई, किशनगंज, अलुआबारी रोड, न्यू जलपाईगुडी, सिलीगुडी, बिन्नागुडी आणि हासीमारा या स्थानकांवर थांबेल.

आरक्षणाशिवाय प्रवासाची संधी

पनवेल–अलीपूरद्वार अमृत भारत एक्स्प्रेसमुळे देशाच्या पश्चिमेकडून ईशान्येकडे थेट आणि सोयीस्कर रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे. या गाडीत आठ शयनयान, ११ सामान्य द्वितीय श्रेणी (जनरल) डब्यांसह एक पॅन्ट्री कार तसेच दोन सामानासह गार्ड ब्रेक व्हॅनचा समावेश असेल. सामान्य द्वितीय श्रेणी डब्यांची संख्या जास्त असल्याने आरक्षणाशिवाय प्रवासाची मोठी संधी जळगावसह भुसावळच्या प्रवाशांना मिळेल. अमृत भारत श्रेणीतील गाड्यांमध्ये आधुनिक सोयी सुविधा, सुधारित आसन व्यवस्था आणि सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. गाडी क्रमांक ११०३१ साठी आरक्षण १९ फेब्रुवारीपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहे.

भुसावळ–दादर विशेष सेवेला मुदतवाढ

पश्चिम रेल्वेने देखील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन भुसावळ–दादर मार्गावरील विशेष गाड्यांना पुन्हा एकदा काही दिवसांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भुसावळहून जळगाव, धरणगाव, अमळनेर, शिंदखेडा, दोंडाईचा आणि नंदुरबारमार्गे मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी होणार आहे. दादर–भुसावळ (०९०४९) आणि भुसावळ–दादर (०९०५०) दरम्यान आठवड्यातून एक दिवस दर शुक्रवारी धावणाऱ्या साप्ताहिक विशेष गाडीचा कालावधी २७ मार्च २०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे. याशिवाय दादर–भुसावळ (०९०५१) आणि भुसावळ–दादर (०९०५२) दरम्यान आठवड्यातून तीन दिवस सोमवार, बुधवार आणि शनिवारी धावणाऱ्या त्रिसाप्ताहिक विशेष रेल्वे गाड्यांचा कालावधी २८ मार्च २०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे.