नदीकाठच्या शेतकऱ्यांना दिलासा

नाशिक : निफाड  तालुक्यातील करंजगाव-कोठुरे पुलाला गोदावरी नदीपात्रात अडकलेल्या पानवेली जेसीबीच्या सहाय्याने काढण्यास पाटबंधारे विभागाने सुरुवात के ली आहे. पानवेली आणि नदीपात्रात रसायनयुक्त सांडपाणी सोडल्यामुळे मागील आठवडय़ात कोठुरे येथे मोठय़ा प्रमाणावर मासे मृतावस्थेत आढळले होते. तसेच या पानवेलीमुळे गोदाकाठच्या सर्वच गावातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

गंगापूर धरणातून गोदावरी नदीत सोडलेल्या विसर्गाची भर पडली. महाराष्ट्र राज्य बियाणे उपसमितीचे सदस्य आणि करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके-पाटील यांनी याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे आणि जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांच्याकडे तक्रार नोंदवित तातडीने पानवेली काढण्यात याव्यात असा आग्रह धरला.

या तक्रोरीची दखल घेत अखेर पानवेळी काढण्यास सुरुवात करण्यात आली. खंडू बोडके यांनी करंजगावचे सरपंच नंदू निरभवणे, सुरेश गांगुर्डे यांच्या समवेत पानवेली काढण्यात येत असलेल्या कामाची पाहणी केली.

याआधी सायखेडा ते चेहडी दरम्यान गोदावरी नदीपात्रातील पानवेली काढण्यात न आल्यास पाटबंधारे विभागाच्या कार्यालयास कु लूप लावण्याचा इशारा खंडू बोडके यांनी दिल्यानंतर २९ मार्चपासून पानवेली काढण्याचे काम सुरू होते. परंतु, बोटी आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे हे काम  साडेतीन महिन्यापासून अतिशय संथपणे सुरू होते.

जिल्हाधिकाऱ्यांकडे बोडके यांनी तक्रार करताच पाटबंधारे विभागाने या कामाला गती दिली. परिसरात सहा ते सात किलोमीटर पसरलेल्या गोदावरी पात्रातील पानवेली काढण्यास पाटबंधारे विभागाला यश आले असले तरी सायखेडा आणि करंजगाव पुलालगत अजूनही एक ते दीड किलोमीटरवर पानवेली शिल्लक असून जेसीबीच्या साहाय्याने या पानवेली काढण्यात येत आहेत. नदीपात्रातील संपूर्ण पानवेली काढल्या गेल्यास नदीकाठच्या गांवाना तसेच शेतकऱ्यांना मोठय़ा प्रमाणावर दिलासा मिळणार आहे. आठवडाभरात करंजगाव परिसरातील संपूर्ण पानवेली काढण्यात येण्याची शक्यता आहे.

गोदावरी नदीपात्रात नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून दरवर्षी पानवेली वाहून येतात. त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. पानवेली काढण्याबाबत सात्यत्याने पाठपुरावा करावा लागतो. पाटबंधारे विभागाने त्यावर कायमस्वरूपी निधीची तरतूद करून गोदाकाठच्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नये.

– खंडू बोडके-पाटील (माजी सरपंच, करंजगाव)