नाशिक : शेतकऱ्यांना मूलभूत सेवा सुविधांसोबतच त्यांना महावितरणच्या माध्यमातून विद्युत पुरवठय़ाचेही काम प्राधान्याने केले जात आहे. कृषिपंप वीज धोरणांतर्गत ७६० कोटींची वीज देयकात सवलत देण्यात आली आहे. यात एक लाख ८३ हजार ४२१ शेतकऱ्यांनी आपली उर्वरीत थकबाकी भरून सहभाग नोंदवला असून इतर शेतकऱ्यांनीही सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त येथे आयोजित मुख्य ध्वजवंदन कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते. यावेळी आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महानगरपालिका आयुक्त रमेश पवार यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. करोना काळात निराधार झालेल्या बालकांसाठी शासकीय मदतदूत योजनेसाठी जिल्हाधिकारी यांचा विशेष पुरस्काराने तर, पोषण आहारातील उल्लेखनीय कार्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सन्मानित करण्यात आले आहे. उत्कृष्ट सेवेबद्दल शासकीय कर्मचारी, पोलीस महासंचालक यांच्या सन्मान चिन्हाने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले.
महाराष्ट्राच्या सुधारणांचा इतिहास आजही प्रेरणादायी आहे. तसेच जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी प्रशासकीय यंत्रणा सातत्यपूर्ण करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे भुजबळ यांनी सांगितले. राज्यात कुठलाही गरजू अन्नधान्यापासून वंचित राहू नये यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून आवश्यक ती काळजी घेण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. जिल्ह्यात आणि विभागात अनेक नाविण्यपूर्ण लोकोपयोगी संकल्पनांची अमलबजावणी सुरू आहे. त्याचीच फलश्रुती म्हणून नागरी सेवा दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयास तृतीय क्रमांकाचे राजीव गांधी प्रशासकीय गतिमानतेचे राज्यस्तरीय पारितोषिक प्रदान करण्यात आले असून त्यासोबतच संपूर्ण नाशिक विभागास नऊ पुरस्कार प्राप्त झाले आहेत, प्रधानमंत्री आवास योजनेत नाशिक जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.शहरी आणि ग्रामीण पोलिसांनी करोनाकाळात घेतलेले परिश्रम सर्वश्रुत आहेत. पोलीस आयुक्त, पोलीस महानिरिक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलात मोठय़ा सकारात्मक घडामोडी घडत आहेत. पोलिस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ आणि पोलीस दलाचे मनोबल वाढविण्यासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटीबद्ध असल्याचे भुजबळ यांनी सांगितले आहे. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी मोठय़ा प्रमाणात वैयक्तीक लाभाच्या योजना, सामुहिक लाभाच्या योजना तसेच आर्थिक विकासाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. शिक्षण क्षेत्रात पारदर्शक, कार्यक्षम व कालबद्ध लोकसेवा देण्याकरिता राज्यात तसेच जिल्ह्यात सेवाहमी कायद्यांतर्गत ३५ सेवा विद्यार्थ्यांसाठी तर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लाभाच्या ७० सेवा अशा १०५ सेवा अधिसूचित करून त्या लागू करण्यात येत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.