नाशिक : महागाई भत्ता तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारपासून राज्य परिवहन कर्मचाऱ्यांनी संप सुरु केल्याने जिल्ह्यात बससेवा ठप्प झाली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात बससेवा बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होत असून खासगी वाहनांच्या त्यांना आधार घ्यावा लागत आहे. प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संपाचा मार्ग स्विकारला असतांना प्रवाशांना मात्र वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दिवाळीत गावी जाण्यासाठी अनेकांनी शाळांना सुट्टी जाहीर  होताच बस स्थानक गाठले. परंतु, एकही बस स्थानकातून बाहेर  पडत नसल्याने त्यांची निराशा  झाली.

शहरातील मध्यवर्ती बस स्थानक, नवीन सीबीएस (ठक्कर बझार), मुंबई नाका स्थानकात बाहेरगावी जाणाऱ्या बस थांबून होत्या. बससेवा ठप्प असल्याने पर्यायी मार्ग म्हणून प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. या संधीचा  फायदा घेत काहींनी प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडेवसुली  केली.

नातवंड आजारी असल्याने नाशिकला येण्यासाठी स्थानकात गेले. पण बस नव्हती. त्यामुळे गावाबाहेरील फाट्यावर जाऊन खासगी वाहनाने नाशिकला आल्याचे शारदा क्षीरसागर यांनी सांगितले.

महामंडळाचे ५६ लाखांचे नुकसान

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे महामंडळाच्या नाशिक विभागाच्या १९६० फेऱ्या रद्द झाल्या आहेत. यामुळे महामंडळाचे ५६ लाखांहून अधिक रकमेचा महसूल बुडाला आहे. दरम्यान, नाशिक विभागीय कार्यशाळेत भाजप आमदार  राहुल ढिकले, सीमा हिरे ,स्थाही समिती मनपा सभापती  गणेश गीते, रवींद्र गांगोले ,मीना बिडगर यांनी भेट देऊन कामगारांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.