जळगाव : भुसावळ–इगतपुरी दरम्यान धावणाऱ्या मेमू रेल्वे गाडीचा विस्तार थेट कसारापर्यंत करण्यात यावा, अशी मागणी प्रवासी वर्गातून आता जोर धरू लागली आहे. सध्या भुसावळहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मुंबई गाठण्यासाठी अनेक टप्प्यांत प्रवास करावा लागत असल्यामुळे वेळ, पैसा आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेचे व्यवस्थापक विवेककुमार गुप्ता यांनीही प्रसार माध्यमांना महत्वाची माहिती दिली आहे.
सध्याच्या परिस्थितीत भुसावळ–मुंबई दरम्यान अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या धावत असल्या, तरी त्यात जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना कधीच हक्काची जागा मिळत नाही. त्यामुळे भुसावळ–इगतपुरी मेमूने प्रवास करणारे प्रवासी इगतपुरी येथे उतरतात. त्यानंतर तेथून दुसरी रेल्वे, बस किंवा खासगी वाहनाने कसारा गाठतात. कसाऱ्याहून पुढे मुंबईसाठी लोकल रेल्वे पकडून प्रवासाचे नियोजन केले जाते. या टप्याटप्प्याच्या प्रवासामुळे गाड्या बदलताना मोठी तारेवरची कसरत करावी लागते. अनेकदा वेळेचे गणित बिघडते, आर्थिक भारही वाढतो. भुसावळहून सुटणारी मेमू रेल्वे थेट कसारापर्यंत चालविण्यात आली, तर भुसावळसह जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड तालुक्यांसह आणि नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांना अनारक्षित आणि परवडणारी मुंबईची थेट जोडणी मिळू शकणार आहे. विशेषतः विद्यार्थी, नोकरदार, छोटे व्यावसायिक आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या प्रवाशांसाठी ही मोठी सोय ठरणार आहे.
मेमूचा कसारापर्यंत विस्तार केल्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांवर अवलंबून राहण्याची गरजही कमी होईल, असा विश्वास प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आरक्षित तिकिटे न मिळाल्याने किंवा गाड्यांची गैरसोय झाल्याने अनेकदा प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. भुसावळ–इगतपुरी मेमू कसारापर्यंत वाढविल्यास ही समस्या मोठ्या प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे. कसारा येथून मुंबईत उपनगरीय सेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचा लाभ जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना होऊ शकेल. भुसावळ–कसारा मेमू सेवा सुरू झाल्यास उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई यांमधील दळणवळण अधिक सुलभ व गतिमान होईल, असा विश्वास प्रवासी व्यक्त करीत आहेत.
महाव्यवस्थापक काय म्हणाले ?
मध्य रेल्वेचे व्यवस्थापक विवेककुमार गुप्ता यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, इगतपुरी आणि कसारा दरम्यानच्या अवघड घाटात चालविण्यासाठी सक्षम असे अत्याधुनिक रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टिमचे डबे सध्या उपलब्ध होत नाही. असे डबे उपलब्ध होत नाही तोपर्यंत भुसावळ–इगतपुरी मेमूचा कसारापर्यंत विस्तार अशक्य आहे. मात्र, भविष्यात इगतपुरी ते कसारा दरम्यानच्या अवघड घाटात तांत्रिक सुधारणा झाल्यास भुसावळ–इगतपुरी मेमूचा कसारापर्यंत विस्तार करण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल.
बडनेरा–नाशिक मेमूचाही विस्तार ?
जिल्ह्यातील प्रवाशांना दुपारच्या वेळी मनमाडसह नाशिक जाण्यासाठी सोयीची ठरणारी बडनेरा–नाशिक रोड ही संपूर्ण अनारक्षित मेमू रेल्वे गाडी देखील अल्पावधीत लोकप्रिय ठरली आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता या गाडीला पुन्हा मुदतवाढ मिळाली असताना, तिचा नाशिकच्या पुढे कसारापर्यंत विस्तार करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. भुसावळ–इगतपुरी मेमूचा कसारापर्यंत विस्तार झाल्यास बडनेरा–नाशिक रोड मेमू गाडीचाही कसारापर्यंत विस्तार होऊ शकणार आहे. अत्याधुनिक रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टिमचे डबे उपलब्ध झाल्यावर मेमू गाड्यांचा कसारापर्यंत विस्तार शक्य आहे. त्यादृष्टीने लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा केला जाण्याची अपेक्षा प्रवासी वर्गाने व्यक्त केली आहे.
