जळगाव : जिल्ह्यातून मुंबई, पुणे नियमित ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी भुसावळहून दोन स्वतंत्र रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र, आता प्रवाशांच्या मागणीची दखल घेतली जाण्याची चिन्हे दिसून आली असून, दोन्ही गाड्यांना लवकरच हिरवा कंदील मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मध्य रेल्वेच्या भुसावळसह जळगाव स्थानकांवर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत दिल्ली, हावडा आणि नागपूरकडून पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात. मात्र, बहुतांश गाड्या तिकडूनच भरून येतात. परिणामी, जिल्ह्यातील प्रवाशांना त्यात कधीच जागा मिळत नाही. बऱ्याच वेळा उभ्याने प्रवास करावा लागतो. दुसरीकडे, भुसावळ–मुंबई पॅसेंजर तसेच भुसावळ–पुणे हुतात्मा एक्स्प्रेस या गाड्या बंद करण्यात आल्या आहेत.
नोकरी, शिक्षण, व्यवसाय तसेच वैद्यकीय उपचारांसाठी मुंबई आणि पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र, आरक्षित तसेच अनारक्षित डब्यांमध्ये जागा न मिळाल्याने प्रवास अडचणीचा ठरतो. यामुळे भुसावळहून मुंबई आणि पुण्यासाठी स्वतंत्र गाड्या सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने करण्यात येत आहे. मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना निवेदने देऊन आणि पत्रव्यवहार करूनही अद्याप या दोन्ही गाड्यांना मंजुरी मिळालेली नाही, ही बाब प्रवाशांमध्ये नाराजी वाढवणारी ठरत आहे.
डीआरएम कार्यालयाकडुनही प्रस्ताव
भुसावळहून मुंबईसह पुण्यासाठी दोन स्वतंत्र गाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या भुसावळ डीआरएम कार्यालयाने यापूर्वीच मुंबई मुख्यालयाकडे पाठवला आहे. त्यास मंजुरी मिळण्याची तेवढी प्रतीक्षा आहे. प्राप्त माहितीनुसार, भुसावळ–मुंबई स्वतंत्र रेल्वे सुरू करण्यासंदर्भात प्राथमिक प्रस्ताव डीआरएम कार्यालयाने एप्रिल २०२४ मध्ये पाठवला आहे. त्यानंतर लगेच परिचालन विभागाने तांत्रिक अहवाल सादर केला आहे. अशाच प्रकारे, भुसावळ–पुणे स्वतंत्र रेल्वे सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव डीआरएम कार्यालयाने एप्रिल २०२४ मध्ये पाठवला आहे. आणि परिचालन विभागाने तांत्रिक अहवाल सादर केला आहे. परंतु, पुढील कार्यवाहीला अद्याप गती मिळालेली नाही.
लोकप्रतिनिधींकडून मोठी अपेक्षा
सध्या भुसावळ–मुंबई आणि भुसावळ–पुणे या दोन्ही गाड्यांचे प्रस्ताव मुंबईतील मध्य रेल्वेच्या मुख्यालयात असून, ते अंतिम मंजुरीसाठी दिल्लीत रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात येणार आहेत. बोर्डाकडून अंतिम मान्यता मिळाल्यानंतर संभाव्य वेळापत्रक आणि मार्गांची निश्चिती होऊ शकणार आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेता दोन्ही गाड्या शक्य तितक्या लवकर सुरू करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि खासदार स्मिता वाघ यांच्याकडूनही पाठपुरावा होण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
